पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील हिंसाचारावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. अमित शाह म्हणाले, होय, आमची सर्वत्र निवडणुका लढण्याची इच्छा आहे. मात्र, आपली विचारधारा, कामगिरी आणि कार्यक्रमाच्या आधारावर. विरोधी पक्षाच्या नेत्यांना मारून आणि महिलांवर अत्याचार करून शासन करायची इच्छा नाही. यावेळी शाह यांनी काँग्रेसवरही तोफ डागली.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, शाह म्हणाले, विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांची हत्या करून आम्हाला सत्ता मिळवायची नाही. ही भाजपची संस्कृती नाही. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या घटनांचा आणि गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या घटनांचा संदर्भ देत अमित शाह म्हणाले, "होय, आम्ही (भाजप) आमची विचारधारा, कामगिरी आणि कार्यक्रमांच्या आधारावर सर्वत्र निवडणुका लढू इच्छितो. एवढेच नाही, तर केंद्रीय गृहमंत्री पुढे म्हणाले, तृणमूल काँग्रेसही गोव्यात निवडणूक लढवण्यासाठी गेली होती, पण विरोधी नेत्यांची हत्या करून आणि महिलांवर अत्याचार करून आम्हाला कोणत्याही राज्यावर शासन करायचे नाही.
काँग्रेसवरही बरसले शाह -काँग्रेसवर हल्ला चढवताना अमित शहा म्हणाले की, जे लोक आपल्या पक्षाची निवडणूक घेऊ शकत नाहीत, ते आम्हाला लोकशाहीसंदर्भात उपदेश देत आहेत. यावेळी आणीबाणीचा उल्लेख करत शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीचा संदर्भ देत शहा म्हणाले, "आम्ही कोणत्याही निवडणुकीला घाबरत नाही, पण आमच्याकडे, भीतीपोटी कशा पद्धतीने आणीबाणी लादली गेली, याचा इतिहास आहे."