नवी दिल्ली - महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता असं विधान करुन अभिनेता कमल हसन याने केलं होतं. मात्र या विधानावरुन सुरु झालेलं राजकारण आता तापू लागलं आहे. नथुराम गोडसे देशभक्त होते, आहेत आणि राहतील या साध्वीच्या विधानाचं समर्थन करणारे ट्विट भाजपाचे केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केल्याने वादात ठिणगी पेटली.
मात्र वाद पेटल्याचं पाहून अनंतकुमार हेगडे यांनी नवीन ट्विट करत ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचा नवा दावा ट्विटरवरुन केला आहे.अनंतकुमार हेगडे यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, गुरुवारी संध्याकाळपासून माझं ट्विटर अकाऊंट हॅक झालं आहे. गांधीजी यांच्या हत्येचं समर्थन करण्याचा प्रश्चच उद्भवत नाही. गांधी यांची हत्या करणाऱ्याबाबत सहानभुती नाही. राष्ट्राच्या योगदानासाठी महात्मा गांधी यांचे योगदान अमुल्य आहे.
साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेले नथुराम गोडसेवर केलेल्या विधानावरुन पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानवरुनही वाद निर्माण झाला होता. या दोन्ही वेळेला भाजपाने साध्वी यांच्या विधानाशी फारकत घेत ते त्यांचे वैयक्तिक मतं असल्याचं सांगितले. त्यानंतर साध्वी यांनी विधानांवर माफी मागितली. मात्र गोडसेबद्दलच्या विधानाबद्दल केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी साध्वीचं समर्थन केलं होतं. या प्रकरणी माफीपासून पुढे जायला हवं. आपण आता पुढे जाणार नाही, तर केव्हा जाणार?, असं ट्विट हेगडेंनी केल्याने हे प्रकरण आणखी चिघळलं.
अनंत कुमार हेगडे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत आहेत. मोदी सरकार सत्तेत येताच संविधान बदलणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यामुळे ते चर्चेत आले. यानंतर त्यांनी सतत वादग्रस्त विधानं केली. आता अनंत कुमार यांनी थेट साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. 'नथुराम गोडसे देशभक्त होते आणि देशभक्त राहतील. त्यांना विरोध करणाऱ्यांना देशातली जनता उत्तर देईल,' असं विधान साध्वींनी केलं होतं. यानंतर पक्षानं त्यांनी माफी मागण्यास सांगितली. यानंतर माफी मागत, मी महात्मा गांधींचा आदर करत असल्याचं साध्वींनी म्हटलं होतं.