आसामचे मुख्यमंत्री तथा भाजप नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना, अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात ट्विट करण्याचे खुले आव्हान दिले आहे. हिमंता बिस्व सरमा यांनी बुधवारी एका कार्यक्रमादरम्यान शरद पवार आणि गौतम अडानी यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीचा उल्लेख करत ही मागणी केली आहे.
रिपब्लिक या वृत्त वाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलताना सीएम सरमा म्हणाले, राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे की, आम्ही अदानी यांचे मित्र आहोत. मी त्यांना ओळखतही नाही. नैऋत्तेकडील लोकांना अदानी, अंबानी आणि टाटांपर्यंत पोहोचायला आणिखी काही वेळ लागेल. आम्ही तेथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही करत आहोत. पण राहुल गांधी यांच्यात हिमंता असेल तर मी त्यांना शरद पवारांविरोधात ट्विट करण्याचे आव्हान देतो. पवारांना अदानींसोबतच्या संबंधांवर प्रश्न विचारा? हे लोक सोयीचे राजकारण करतात.
हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, आपण (राहुल गांधी) भाजप आणि अदानींवर काही ट्विट करता, मात्र जेव्हा गौतम अदानी शरद पवारांच्या घरी जातात आणि तेथे 2-3 तास घालवतात. तेव्हा राहुल गांधी ट्विट का करत नाहीत. मला शरद पवार आणि अदानी यांच्या भेटीसंदर्भात कसल्याही प्रकारची समस्या नाही, असेही सरमा म्हणाले.
राहुल गांधी यांनी नुकतेच आपल्या एका ट्विटमध्ये हिमंता बिस्वा सरमा, गुलाम नबी आझाद यांच्या सारख्या काही माजी काँग्रेस नेत्यांचे नाव अडानींसोबत जोडले होते. 'हे सत्य लपवतात, म्हणूनच लोकांची रोज दिशाभूल करतात,' असे त्यांनी लिहिले होते. याच ट्विटसंदर्भात आसमच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीप्रकरण दाखल करण्याचा इशारा दिला होता.