BJP MP Sujay Vikhe-Patil On Union Budget 2023: लोकसभा निवडणुकीआधीचा शेवटचा पूर्णवेळ अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला. यामध्ये मध्यमवर्गाला दिलासा मिळण्यासाठी करसवलतीची मर्यादा ५ लाखांवरून ७ लाख करण्यात आली आहे. याशिवाय काही गोष्टी महाग झाल्यात, तर काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. विरोधकांकडून टीका केली जात आहे. भाजप नेते आणि खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेत अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
विरोधक बजेटबाबत चांगले बोलतील, याची अपेक्षाच नाही. मात्र, या अर्थसंकल्पात करसवलतीची वाढवलेली मर्याचा महत्त्वाची आहे. करसवलतीतून जे पैसे सामान्य जनतेचे वाचतील, ते पैसे गुंतवणुकीच्या माध्यमातून बाजारात येतील. या वेगळ्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकास वाढवण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी करत आहेत, असे सुजय विखे-पाटील यांनी सांगितले.
सहकाराला चालना देणारा अर्थसंकल्प
देशातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे, ज्यातून सहकाराला चालना देण्याचे काम करण्यात आले आहे. यातील अनेक गोष्टींना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. नवीन संस्था स्थापन होतील, त्यांच्याबाबतही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. हा अर्थसंकल्प विस्तृत असून, यामध्ये प्रत्येक अँगल घेण्यात आलेला आहे. हा सगळा अँगल विरोधकांना कळावा, इतकी बुद्धिमत्ता विरोधकांची नाही, अशी टीका सुजय विखे-पाटील यांनी केली
दरम्यान, संसदेतील विरोधी बाके रिकामी होती. याचा अर्थ ते आलेच नाहीत. हा अर्थसंकल्प योग्य होता. यातून सर्वसामान्य माणसाला मोठा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करतोय आणि मध्यमवर्गीयांना या अर्थसंकल्पातून दिलासा देण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे, असे सुजय विखे-पाटील यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"