गेल्या 4 दशकांत डाव्या विचारसरणीच्या कट्टरतावादाने प्रभावित असलेल्या भागांत, सर्वात कमी हिंसाचार आणि मृत्यू 2022 मध्ये नोंदवले गेले. आगामी दोन वर्षांत देशातून डाव्या विचारसरणीच्या कट्टरतेचा पूर्णपणे नायनाट होईल. नक्षलवाद हा मानवतेसाठी शाप आहे आणि आम्ही, त्याच्या सर्व रुपांचा खात्मा करण्यास कटिबद्ध आहोत, असे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. शाह यांनी शुक्रवारी डाव्या विचारसरणीच्या कट्टरतावादाने प्रभावित राज्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
नक्षल प्रभावित राज्यांमधील हिंसचाराच्या घटना 2010 च्या तुलनेत 2022 मध्ये 77 टक्यांनी कमी झाल्या असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. याशिवाय, केंद्र सरकारने 2015 मध्ये एलडब्ल्यूईचा सामना करण्यासाठी 'राष्ट्रीय धोरण आणि कृती आराखड्या'ला मंजुरी दिली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या धोरणात सुरक्षेसंदर्भातील उपाय, विकास हस्तक्षेप, स्थानिक समुदायांचे अधिकार आणि हक्क सुनिश्चित करणे इत्यादींचा समावेश होता.
या आढावा बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल, इंटेलिजन्स ब्यूरोचे संचालक तपन डेका, तसेच एनआयए, एसएसबी, बीएसएफ, सीआरपीएफ, बीएसएफ आणि एनएसजीच्या महासंचालकांसह नक्षलग्रस्त राज्यांचे गृह सचिव आणि मुख्य सचिवही उपस्थित होते.