Nitin Gadkari On Union Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या या कार्यकाळाचा पूर्णवेळ शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये करसवलतीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. तर काही गोष्टी महाग, तर काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. एकीकडे विरोधक अर्थसंकल्पावर टीका करत असताना दुसरीकडे, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांना सर्वाधिक प्राधान्य दिलं आहे. आमचा अर्थसंकल्प खूप वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात भारतात जागतिक दर्जाचे रस्ते तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आम्ही पूर्ण करू. ‘ग्रीन एनर्जी’, ‘ग्रीन पॉवर’ असा सर्वच ठिकाणी जो ‘ग्रीन’ उल्लेख झाला, हे पर्यावरण संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.
हा अर्थसंकल्प गरिबांचे, कामगारांचे, शेतकऱ्यांचे कल्याण करणारा
या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य हे आहे की, सामान्य माणसाच्या आयुष्यात हवा-पाणी प्रदुषणाचे प्रश्न गंभीर आहेत. पर्यावरणपुरक धोरणामुळे या प्रदुषणात मोठी सुधारणा होईल. आधी मध्यमवर्गाविषयी विचार केला जात नव्हता. यावेळी पहिल्यांदा मध्यमवर्गीयांनाही मोठा दिलासा दिला आहे. हा अर्थसंकल्प गरिबांचे, कामगारांचे आणि शेतकऱ्यांचे कल्याण करणारा आहे, असे नितीन गडकरी यांनी नमूद केले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प भारताच्या अर्थव्यवस्थेला जगात सुपर इकॉनॉमिक पॉवर करण्यासाठी उपयोगी येईल. आता स्क्रॅपिंग धोरणामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या विभागांमध्ये नव्या गाड्या येतील. त्यामुळे प्रदुषण कमी होईल, असे गडकरी यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"