अनुराग ठाकूर आणि राहुल गांधी यांच्यात मंगळवारी लोकसभेमध्ये जबरदस्त खडाजंगी बघायला मिळाली. एवढेच नाही, तर जात जनगणनेच्या मुद्द्यावर सुरू असलेली चर्चा वैयक्तिक टिप्पण्यांपर्यंत जाऊन पोहोचली. जातवार जनगणनेसंदर्भात बोलताना कुणाचेही नाव न घेता अनुराग ठाकूर म्हणाले, "आज काही लोकांवर जातवार जनगणनेचे भूत स्वार झाले आहे. ज्याच्या जातीचा पत्ता नाही, तो जनगणनेसंदर्भात बोलतो." अनुराग ठाकूर यांच्या या वक्तव्यावर राहुल गांधी भडकले आणि म्हणाले, "तुम्ही माझा अपमान करू शकता. मी ते सहन करेन. पण आम्ही जात जनगणना करवूनच राहू."
यावर अनुराग ठाकूर यांनी पुन्हा टोला लगावला आणि म्हणाले, त्यात आपल्यालाही आपली जात लिहावी लागेल. यांना तर मधे बोलण्यासाठीही चिठ्ठी येते. पण उधारीच्या बुद्धीने काम कसे चालेल? काही लोकांवर जातवार जनगणनेचे भूत स्वार आहे. मी म्हटले होते, ज्याला जात माहीत नाही, तो जनगणनेबद्दल बोलतोय. मी तर कुणाचे नाव घेतले नव्हते. उत्तर द्यायला कोण उभे राहिले? यावर राहुल गांधी पुन्हा उभे राहिले आणि म्हणाले, "यादेशात जे कुणी ओबीसी, दलित आणि आदिवासीचा आवाज उचलतं, त्याला शिव्या खाव्याच लागतात. या शिव्या मी आनंदाने खाईन."
एवढेच नाही तर, महाभारताचा विषयच निघालाच आहे तर सांगतो की, अर्जुनाला केवळ माशाचा डोळा दिसला होता. त्याचप्रमाणे मला केवळ जातनिहाय जनगणनाच दिसत आहे, जी आम्ही करूनच राहू. अनुराग ठाकूर यांनी मला शिवी दिली आहे. मात्र मला त्यांच्याकडून माफीची अपेक्षा नाही. मी तर लढाई लढत आहे."
राहुल गांधी यांच्या प्रत्युत्तरानांतर सभागृहात पुन्हा गदारोळ सुरू झाला. यावर अध्यक्षांच्या आसनावर असलेल्या जगदंबिका पाल यांनी सर्वांना शांत राहण्यास सांगितले. तेव्हा अखिलेश यादव यांनीही चर्चेत भाग घेतला. तसेच राहुल गांधी यांना पाठिंबा देत केंद्र आणि सत्ताधारी भाजपावर टीका केली आणि सभागृहामध्ये कुणाची जात कशी विचारली जाऊ शकते? असा प्रश्न उपस्थित केला. यावर पुन्हा अनुराग ठाकूर म्हणाले, मी कुणाचेही नाव घेतले नाही. मग कुणी का उभे राहत आहे? माझ्या बोलण्याचे रेकॉर्ड चेक केले जाऊ शकते.