चेन्नई: तमिळनाडूच्या चेन्नईमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्याची कार पेटवण्यात आल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली. त्या प्रकरणी भाजपचे जिल्हा सचिव सथीश कुमार यांनी तक्रार दाखल केली होती. १४ एप्रिलला रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी आसपासच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली.
सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालेल्या व्हिडीओमध्ये पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेली एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारच्या जवळून जाते. ती कारच्या खिडक्यांमधून आत डोकावून पाहण्याचा प्रयत्न करते. नंतर ती तिथून दूर निघून जाते. पुढच्या काही क्षणांत तिथे गडद रंगाचे कपडे घातलेली व्यक्ती येते. ती कारवर काहीतरी स्प्रे करते. त्यानंतर कार लगेच पेट घेते. कार पेट घेताच ती व्यक्ती तिथून पळून जाते.
कारनं पेट घेतल्याची माहिती आसपासचे लोक भाजप नेत्याच्या कुटुंबाला देतात. त्यानंतर भाजप नेता पोलिसांना बोलावतो. पेट्रोल बॉम्ब टाकल्याची अफवा पसरल्यानं पोलीस तातडीनं घटनास्थळी धाव घेतात. आसपासच्या भागात असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासतात. कारला आग लावणारी व्यक्ती खुद्द सथीश कुमारच असल्याचं पोलिसांच्या लक्षात येतं. त्यानंतर सथीश यांची चौकशी होते. त्यात ते गुन्ह्याची कबुली देतात.
सथीश यांच्या पत्नीला सोन्याचे दागिने हवे होते. त्यासाठी तिनं गेल्या काही दिवसांपासून तगादा लावला होता. पण सथीश यांना दागिने विकत घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे मग पत्नी कार विकण्यासाठी आग्रह करू लागली. अखेर सथीश यांनी कार पेटवण्याचं ठरवलं. त्यानंतर विम्याच्या पैशातून ते पत्नीसाठी दागिने खरेदी करणार होते. मात्र सीसीटीव्ही फुटेजमुळे त्यांचा प्लान उधळला गेला. सत्य समोर येताच पोलिसांनी सथीश यांना ताब्यात घेतलं.