Karnataka Politics: कर्नाटकात भाजपकडून पुन्हा ऑपरेशन लोटस राबवले जाऊ शकते, अशी मोठी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याचे कारण एका भाजपने नेत्याने मोठा दावा करत काँग्रेसचे ४५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. यामुळे काँग्रेसच्या गोटात पुन्हा एकदा खळबळ उडाल्याचे म्हटले जात आहे. यावरून कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
कॉंग्रेसचे ४५ आमदार आपल्या संपर्कात असल्याच्या भाजप राष्ट्रीय संघटना सचिव बी. एल. संतोष यांच्या दाव्यावरून कॉंग्रेसमध्ये तीव्र पडसाद उमटले. राज्यातील कॉंग्रेस सरकार कोसळेल, अशा भ्रमात भाजप असल्याची टीका करून संतोष यांचे हे स्वप्न साकार होणार नसल्याच्या प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी दिल्या. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी उपरोधिकपणे सांगितले की, बी.एल. संतोष यांनी सर्व काँग्रेस आमदारांशी संपर्क साधला, तर आम्हाला आनंदच होईल, असा टोला लगावला.
‘ऑपरेशन कमळ’ची नेहमीच काळजी असते, पण...
राज्य सरकार पडेल या भ्रमात भाजप असल्याची टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश यांनी केली. ‘ऑपरेशन कमळ’ची आम्हाला नेहमीच काळजी असते. पण आता तसे वातावरण नसल्याचे ते म्हणाले. उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनीही संतोष यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेऊन भाजपातील नाराज आमदारांना पक्षात टिकवून ठेवण्याचा हा त्यांचा एक केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका केली आहे.
दरम्यान, ‘ऑपरेशन कमळ’साठी पैसा कुठून येतो? याचे उत्तर संतोष यांनी द्यावे. तुम्हाला एक दिवस नाही, महिन्याभराचा कालावधी देऊ. ४५ नव्हे तर चार आमदार फोडून दाखवा. येडियुराप्पा यांना संतोष यांनीच तिकीट दिले नाही. त्याचे उत्तर आधी त्यांनी द्यावे, असा पलटवार प्रियांक खरगे यांनी केला.