नवी दिल्ली - पंजाबमधील भाजपाचे नेते भूपेश अग्रवाल (BJP Bhupesh Aggarwal) आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर शेतकरी आंदोलकांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे आहे. अग्रवाल यांच्यावर पटियाला जिल्ह्यातील राजापुरा येथे शेतकरी आंदोलकांनी हल्ला केला आहे. अग्रवाल हे पंजाबच्या पटियालामध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यावेळी शेतकरी आंदोलक कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचले आणि त्यांनी भाजपा नेता आणि कार्यकर्त्यांवर दगडफेक करण्यास तसेच लाठ्या-काठ्यांनी हल्ला करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी वेळीच यामध्ये हस्तक्षेप केल्याने भाजपा नेत्याला या हल्ल्यापासून वाचवण्यात यश आले आहे. मात्र भूपेश अग्रवाल यांनी पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत.
"500 शेतकऱ्यांनी हल्ला केला, माझ्या जीवाला धोका... हल्ल्याला पोलिसांचं पाठबळ" असा दावा भाजपा नेत्याने केला आहे. भूपेश अग्रवाल यांनी शेतकऱ्यांनी केलेल्या या हल्ल्याला स्थानिक पोलिसांचं पाठबळ असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. "500 शेतकऱ्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्यावेळी डीएसपी तिवाना (पोलीस उप-अधीक्षक) तेथे उपस्थित होते. त्यांनी मला मुद्दाम चुकीच्या दिशेने पाठवलं. माझ्यासोबत पोलिसांची तुकडी पाठवण्यात आली नाही. माझ्या जीवाला धोका आहे. मी अनेकदा येथील वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना) फोन केला मात्र त्या फोन कॉल्सला उत्तर देण्यात आलं नाही. आमच्या मागण्यांकडे फारसे लक्ष दिलं नाही. त्यांनी मुद्दाम हे केलं" असा आरोप अग्रवाल यांनी केला आहे.
डीसीपी जेएस तिवाना यांनी भाजपा नेत्याने केलेले गंभीर आरोप फेटाळून लावले आहेत. भूपेश अग्रवाल आणि त्यांच्या सहकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आल्याचं म्हटलं आहे. "सर्व आरोप खोटे आहेत. 100 पोलीस कर्मचारी आणि स्टेशन ऑफिसर सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. शेतकरी भाजपा नेत्याच्या घराबाहेर आंदोलन करत होते आणि भाजपा नेत्यांचा कार्यक्रम कार्यालयामध्ये सुरू होता. त्यांना आम्ही सुरक्षितपणे बाहेर काढलं आणि त्यांच्या गाड्यांपर्यंत नेलं. त्यानंतर त्यांना आंदोलक शेतकऱ्यांनी घेरलं असेल पण आमच्यासमोर असा कोणताच प्रकार घडला नाही" असं तिवाना यांनी म्हटलं आहे.