ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. १३ - महाराष्ट्र व केंद्रात भाजपाला साथ देणा-या शिवसेनेने आता उत्तरप्रदेशमध्ये भाजपावर कुरघोडी करण्याची रणनिती आखली आहे. शिवसेनेचे उत्तरप्रदेशमधील नेते अनिल सिंह यांनी भाजपाला बोगस रामभक्त असे संबोधित करत उत्तरप्रदेशमध्ये सत्तेवर आल्यास राम मंदिर बांधू असे आश्वासन दिले आहे.
उत्तरप्रदेशमध्यए २०१७ मध्ये विधानसभा निवडणूक होणार असून यासाठी शिवसेनेने आत्तापासूनच कंबर कसली आहे आहे. शिवसेना उत्तरप्रदेश विधानसभेच्या सर्व जागा (४०३ जागा) लढवेल अशी घोषणा अनिल सिंह यांनी केली आहे. या शिवाय राम मंदिरचा प्रश्न हाती घेत शिवसेनेने उत्तरप्रदेशमधील हिंदू मतांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. 'आम्ही जे सांगतो तेच करतो, जनतेने बोगस रामभक्तांपासून सावधान राहावे असे सांगत अनिल सिंह यांनी भाजपावर निशाणा साधला. केंद्रात सत्तेवर येऊनही भाजपा अयोध्येत राम मंदिर बांधत नसल्याने भाजपा नेते हे बोगस रामभक्त आहेत असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. मुसलमानांचा आरक्षण देऊन त्यांचा विकास होणार नाही. तर नसबंदी व फक्त दोन अपत्याचे बंधन घातल्यावर मुसलमान समाजाचा विकास होईल असेही त्यांनी सांगितले. उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्ष हा नमाजवादी पक्ष बनल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली.