बंगळुरू - कर्नाटकमध्ये कुमारस्वामी पडल्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेसाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे. दरम्यान, भाजपाचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडियुरप्पा राज्यपाल वजुभाई वाला यांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल झाले आहेत. या भेटीदरम्यान येडियुरप्पा हे सरकार स्थापनेचा दावा केला आहे. दरम्यान, आज संध्याकाळी येडियुरप्पा हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
राज्यपालांची भेट घेऊन येडियुरप्पा त्यांना 105 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र सोपवले, तसेत त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला. दरम्यान, येडियुरप्पा हेच भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याचे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा भाजपाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा हे करतील. त्यानंतर आज संध्याकाळी येडियुरप्पा यांचा शपथविधी होणार आहे. दरम्यान, कर्नाटकमध्ये पर्यायी सरकार स्थापन करण्याची संधी मिळाल्यास भाजप नेते येदियुरप्पा यांना त्यासाठी कसरत करावी लागणार आहेत. भाजप आमदारांपैकी ५६ ज्येष्ठ आमदारांनाही मंत्रीपद हवे आहे. त्याशिवाय १५ बंडखोर आमदारांपैकी काही जणांना महत्त्वाची पदे द्यावी लागतील.
कर्नाटक मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह फक्त ३४ मंत्र्यांचा समावेश होऊ शकणार आहे. त्यामुळे भाजप व बंडखोर आमदारांमधील ज्यांना मंत्रीपदे मिळणार नाहीत ते येडीयुरप्पा यांच्यासाठी भविष्यात डोकेदुखी ठरू शकतात. कर्नाटकात कोणीही सरकार स्थापन केले, तरी ते स्थिर राहू शकणार नाही, असे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी म्हटले होते.
दरम्यान, कर्नाटक विधानसभाध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी तीन बंडखोर आमदारांना अपात्र ठरवले आहे. यामध्ये एका अपक्ष आमदाराचा आणि दोन काँग्रेस आमदारांचा समावेश आहे. कुमारस्वामी यांच्या सरकारविरोधात एकूण १७ आमदारांनी बंड केले होते. या आमदारांनी त्यांचे राजीनामे रमेश कुमार यांच्याकडे सोपवले होते. त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळले.