शहाजहानपूर : कायदा शाखेच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) चिन्मयानंद यांना निवासस्थानातून अटक केली. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्यांच्या वकील पूजा सिंह यांनी सांगितले की, अटकेसंदर्भातील मेमोवर एसआयटीने चिन्मयानंद यांच्या स्वाक्षºया घेतल्या; परंतु अटकेसंदर्भातील अन्य कोणतीही कागदपत्रे त्यांना देण्यात आली नाहीत. चिन्मयानंद यांना सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेले असता तिथे अन्य कोणालाही काही काळ प्रवेश नाकारल्याने अन्य रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे हाल झाले. त्यांच्या अटकेमध्ये कोणतीही बाधा येऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांचे निवासस्थान, रुग्णालय, न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. चिन्मयानंद यांच्या संस्थेतर्फे चालविण्यात येणाºया महाविद्यालयात कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने चिन्मयानंद यांनी बलात्कार केल्याचा, तसेच वर्षभर लैंगिक पिळवणूक केल्याचा आरोप केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास सुरू होता. चिन्मयानंद तीनदा लोकसभेवर निवडून आले होते. ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातही होते. (वृत्तसंस्था)>आत्मदहनाचा दिला होता इशाराचिन्मयानंद यांना अटक न केल्यास आत्मदहनाचा इशारा बलात्कारपीडित विद्यार्थिनीने याआधी दिला होता. तिने दिलेला मोबाईल फोन व पेन ड्राईव्ह हे फोरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या पेन ड्राईव्हमध्ये ४४ व्हिडिओ फिती असून, आरोप सिद्ध होण्यासाठी तो सबळ पुरावा असल्याचा तिचा दावा आहे.ही विद्यार्थिनी जिथे शिकत होती त्या दोन महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडेही पोलिसांनी चौकशी केली आहे.
भाजप नेते चिन्मयानंद यांना बलात्कारप्रकरणी अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 5:07 AM