राजेश निस्ताने -पणजी : भाजपचे गोवा विधानसभा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांची बहुतांश एनर्जी पक्षातील नाराजांची मनधरणी करण्यातच खर्ची पडत आहे. भाजप गोवा विधानसभेच्या सर्वच ४० जागांवर निवडणूक लढवित आहे; परंतु या ४० पैकी २१ उमेदवार हे बाहेरचे अर्थात अन्य पक्षातून आलेले आहेत. त्यामुळे मूळ भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते नाराज आहेत.
संघाची मंडळी तर अद्याप प्रचाराला घराबाहेर पडलेली नाही. त्यामुळे या पक्षातील नाराज नेते-पदाधिकाऱ्यांची मनधरणी करून त्यांना प्रचारात सक्रिय करण्यातच फडणवीसांचा वेळ जातो आहे.
फडणवीस अनेक दिवसांपासून येथे मुक्कामी आहेत. गत पोटनिवडणुकीच्यावेळी आश्वासन देऊनही दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल यांचे तिकीट कापणे हेसुद्धा संघ-भाजपातील नाराजीचे एक कारण असल्याचे सांगितले जाते.
गोव्यातील भाजप सरकारचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीसारखा - अशोकराव चव्हाण गोव्यात सलग भाजपचे सरकार आहे; परंतु या सरकारचा कारभार केंद्रातून नियंत्रित केला जातोय. या सरकारची अवस्था गेली पाचही वर्षे ईस्ट इंडिया कंपनीसारखी झालेली आहे, अशी टीका महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा गोवा विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे स्टार प्रचारक अशोकराव चव्हाण यांनी केली. चव्हाण म्हणाले, गोव्यातील जनतेला स्थिर सरकार हवे आहे आणि ही स्थिरता केवळ काँग्रेसच देऊ शकते. भाजपने १० वर्षे घालवली; परंतु येथील रोजगाराचा ज्वलंत प्रश्न केंद्र व राज्यातील भाजप सरकारला सोडविता आला नाही.