कोलकाता - भाजपाचे नेतेमंडळी सध्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. भाजपाचेपश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी आता एक अजब विधान केलं आहे. 'सुशिक्षित असलेले जे लोक रस्त्यावर गोमांस खातात त्यांनी श्वानाचे मांस खावे. ते आरोग्यासाठी चांगलं असतं' असं दिलीप घोष यांनी म्हटलं आहे. बर्दवानमध्ये गोप अष्टमीच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात घोष यांनी हे अजब विधान केलं आहे.
भाजपाच्या दिलीप घोष यांनी फक्त श्वानच नाही तर आणखी प्राणी आहेत त्यांचं देखील मांस खा. तुम्हाला कोणी अडवलं आहे? मात्र तुम्ही घरी भोजन करा असं म्हटलं आहे. तसेच 'गाय आपली माता आहे आणि गायीला मारणं असामाजिक आहे. समाजात असे अनेक लोक आहेत जे घरामध्ये विदेशी श्वान पाळतात. तसेच त्यांचे मलमूत्र देखील साफ करतात. मात्र हा मोठा अपराध आहे' असं घोष यांनी म्हटलं आहे.
'भारत हे भगवान कृष्णाचे स्थान आहे आणि येथे गायींप्रति नेहमीच सन्मान आणि आदर असतो. गायीच्या दूध पिऊन मुलं जगतात. गाय आपली आई आहे. त्यामुळे हिला कोणी मारलं तर आम्ही ते अजिबात सहन करणार नाही' असं देखील बर्दवानमधील कार्यक्रमात घोष यांनी म्हटलं आहे. गायीच्या दुधामध्ये सोनं असतं. त्यामुळेच ते सोनेरी दिसत असल्याचा दावा ही त्यांनी केला आहे. तसेच देशी गायी आणि विदेशी गायींची त्यांनी तुलना केली आहे. 'विदेशी गाय नाही तर फक्त देशी गाय आपली आई आहे. ज्या लोकांची पत्नी विदेशी आहे. ते आता कठिण परिस्थितीत आहेत' असं दिलीप घोष यांनी म्हटलं आहे.
दिल्ली-एनसीआर भागामध्ये सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणीची परिस्थिती असल्याचे पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाने (ईपीसीए) जाहीर केले. या भागामध्ये 5 नोव्हेंबरपर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास ईपीसीएने मनाई केली आहे. तसेच प्रदूषण आणि खराब हवामानामुळे दोन दिवस नोएडातील शाळा बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. प्रदूषणाने कमाल पातळीही ओलांडली असून, नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. अशातच भाजपाच्या एका मंत्र्यांनी अजब विधान केलं आहे.
दिल्ली आणि आसपासच्या राज्यांतील प्रदूषणावर भाजपाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री सुनील भराला यांनी अजब उपाय सुचवला आहे. प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी इंद्रदेवाला खूश करा आणि यज्ञ करा, ते सगळं काही ठीक करतील, असा उपाय भराला यांनी सांगितला आहे. 'प्रदूषणाच्या समस्येला 'पराली'ला जबाबदार ठरवणं म्हणजे हा थेट शेतकऱ्यांवरच हल्ला आहे. ऊस आणि डाळींचं उत्पादन घेतल्यानंतर शेतात कचरा होतो. शेतकरी ते पेटवून देतात. त्यामुळे धूर होतो. मात्र यामुळे प्रदूषण होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जबाबदार धरू नये' असं सुनील भराला यांनी म्हटलं आहे.