पश्चिम बंगालमधील खरगपूरमध्ये भाजपाचे वरिष्ठ नेते महिलांशी भिडल्याचं पाहायला मिळालं. भाजपाचे माजी खासदार दिलीप घोष एका रस्त्याच्या उद्घाटन समारंभासाठी आले होते. त्यावेळी महिलांनी त्यांना अडवलं आणि यामुळे वाद निर्माण झाला. संसदीय कारकिर्दीत या भागात न येण्याबद्दल स्थानिक महिलांनी घोष यांना जाब विचारला तेव्हा ते संतापले. रागाच्या भरात त्यांनी महिलांना धमकावलं. तसेच अपशब्दही वापरले. ओरडू नका, जर तुम्ही ओरडलात, तर मी तुमचा गळा दाबेन असं म्हटलं.
खरगपूर नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक ६ मधील मठ पाडा परिसरात ही घटना घडली. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, माजी खासदार दिलीप घोष एका रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रमात पोहोचले होते. स्थानिक महिलांनी त्यांचा निषेध केला. जर रस्ता महापालिकेच्या निधीतून बांधला गेला आहे तर या उद्घाटनासाठी का आले आहात असा सवाल विचारला. यावर घोष रागावले आणि म्हणाले की, हे कोणाच्याही बापाचे पैसे नाहीत, मी खासदार असताना यासाठी निधी दिला होता. जेव्हा महिलांनी याचा निषेध केला तेव्हा ते आणखी संतप्त झाले.
"तुमच्या चौदा पिढ्यांना आठवण करून देईन"
दिलीप घोष इथेच थांबले नाहीत. खासदार असताना ते कधीच या परिसरात का दिसले नाहीत, असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला तेव्हा घोष अधिक संतापले. एका महिलेने आक्षेप घेतला आणि विचारले की, तुम्ही आमच्या वडिलांचा उल्लेख का करत आहात. तुम्ही खासदार होता. यावर घोष यांनी मी तुमच्या चौदा पिढ्यांना आठवण करून देईन असं उत्तर दिलं. यानंतर परिस्थिती अधिकच चिघळली आणि महिलांनी घोष यांच्या गाडीला घेराव घातला.
"हे लोक फक्त ५०० रुपयांसाठी भुंकत होते"
जेव्हा रस्त्यावर गोंधळ वाढला तेव्हा दिलीप घोष म्हणाले की, हा निषेध तृणमूल काँग्रेसच्या लोकांनी केला होता. हा कोणताही विरोध नव्हता, हे लोक फक्त ५०० रुपयांसाठी भुंकत होते. जे लोक भुंकतात त्यांना दिलीप घोष त्यांच्या पूर्वजांची आठवण करून देतील असंही भाजपा नेत्याने म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेसने या विधानाचा निषेध केला आणि घोष यांचे वर्तन अशोभनीय आणि अपमानजनक असल्याचं म्हटलं आहे.