नवी दिल्ली - भाजपाचे राज्यसभा खासदार विजय गोयल यांनी केजरीवाल सरकारच्या निषेधार्थ सोमवारी (4 नोव्हेंबर) 'इव्हन डे' ला 'ऑड' क्रमांकाच्या वाहनाने प्रवास केला आहे. मात्र या दरम्यान वाहतूक पोलिसांनी त्यांचे 4 हजार रुपयांची पावती फाडली आहे. गोयल यांचा ऑड मार्गावरील प्रवास पाहण्यासाठी लोकांनी गर्द केली होती. सम-विषम हा केजरीवाल सरकारचा निवडणूक स्टंट असल्याचा आरोप विजय गोयल यांनी केला आहे. गोयल यांच्या एसयूव्ही कारमध्ये भाजपाचे उपाध्यक्ष श्याम जाजू आणि इतर नेतेही होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक मार्गावरील निवासस्थानावरून गोयल निघाले व त्यांना जनपथला रोखून वाहतूक पोलिसांनी चार हजार रुपयांची पावती फाडली. 'प्रदूषण की जिम्मेदार केजरीवाल सरकार... ऑड-इव्हन हे बेकार' असा नारा विजय गोयल यांच्या कारवर लिहिलेला होता. विशेष म्हणजे त्यानंतर दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गहलोत यांनी गोयल यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ दिले व नियमांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी प्रदूषणापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी दिल्लीकरांना गाजर खाण्याचा सल्ला दिला आहे. त्यासह मंत्र्यांनी इतरही काही टिप्स दिल्या आहेत. गाजरासह प्रदूषणरोधक फळं खाण्याचा सल्ला दिला आहे. दिल्ली-एनसीआर भागामध्ये सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणीची परिस्थिती असल्याचे पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाने (ईपीसीए) जाहीर केले. या भागामध्ये 5 नोव्हेंबरपर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास ईपीसीएने मनाई केली आहे. तसेच प्रदूषण आणि खराब हवामानामुळे दोन दिवस नोएडातील शाळा बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. प्रदूषणाने कमाल पातळीही ओलांडली असून, नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. अशातच भाजपाच्या एका मंत्र्यांनी अजब विधान केलं आहे.
दिल्ली आणि आसपासच्या राज्यांतील प्रदूषणावर भाजपाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री सुनील भराला यांनी अजब उपाय सुचवला आहे. प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी इंद्रदेवाला खूश करा आणि यज्ञ करा, ते सगळं काही ठीक करतील, असा उपाय भराला यांनी सांगितला आहे. 'प्रदूषणाच्या समस्येला 'पराली'ला जबाबदार ठरवणं म्हणजे हा थेट शेतकऱ्यांवरच हल्ला आहे. ऊस आणि डाळींचं उत्पादन घेतल्यानंतर शेतात कचरा होतो. शेतकरी ते पेटवून देतात. त्यामुळे धूर होतो. मात्र यामुळे प्रदूषण होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जबाबदार धरू नये' असं सुनील भराला यांनी म्हटलं आहे.