नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये मंगळवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये भाजपाच्या नेत्याने जनतेला "हम दो हमारे पांच"चा संकल्प करण्याचं आवाहन केलं आहे. भाजपाच्या व्यापार विभागाचे उत्तर प्रदेशमधील संयोजक असणाऱ्या विनीत अग्रवाल शारदा (Vineet Agrawal Sharda) यांनी आपल्या भाषणात असं म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी मुलांना हत्यारं विकत घेणं आणि ती चालवणंही शिकवलं पाहिजे असं देखील म्हटलं आहे. जोपर्यंत कुटुंब नियोजनासंदर्भातील नियम बनवला जात नाही तोपर्यंत आपण हम दो हमारे पाचचा संकल्प केला पाहिजे असं म्हटलं आहे.
विनीत अग्रवाल शारदा यांनी "जोपर्यंत कुटुंबनियोजनाचा ठोस नियम तयार होत नाही तोपर्यंत हम दो हमारे दोचा सिद्धांत संपवला पाहिजे असं म्हटलं आहे. तसेच यावेळेस शारदा यांनी सरकारलाही आवाहन करताना, आमचे दोन त्यांचेही दोनचा नियम करावा किंवा हम दो हमारे पाचचा संकल्प करावा असं म्हटलं आहे. भाजपा नेत्याने या पाच मुलांना काय काम देण्यात यावं यासंदर्भातही आपल्या भाषणामध्ये भाष्य केलं आहे. "पाच मुलांपैकी सर्वाधिक शिकलेल्या मुलाला राजकारणात पाठवावं. एका मुलाला मान, मर्यादा आणि प्रतिष्ठेचे संरक्षण करण्यासाठी हत्यार खरेदी करणं आणि ते चालवणं शिकवावं."
"एका मुलाला भारतीय लष्करात पाठावे. एकाला व्यापारी करावं आणि एका मुलाला आयएएस किंवा पीसीएस बनवून भारतीयांच्या सेवेसाठी सक्षम करावं" असं म्हटलं आहे. आज लोकशाहीसाठी अत्यंत पवित्र दिवस असून आजच्याच दिवशी सरकारने सर्वांसाठी "हम दो हमारे दो" चा नियम बनवावा किंवा आजपासून आपण सर्वांनी "हम दो हमारे पाच" चा संकल्प अंमलात आणावा, असंही विनीत अग्रवाल शारदा यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेल्या भाषणात म्हटलं आहे.
आपल्या भाषणामध्ये शारदा यांनी महाराज दशरथ यांना चार पुत्र होते. दशरथ यांना चार पुत्र नसते तर आजही रावणाचे राज्य संपुष्टात आले नसते. त्यामुळेच देशात हम दो हमारे पाचची गरज आहे. असं झालं नाही तर भारतमाता पुन्हा एकदा रडेल असं म्हटलं आहे. तसेच भारतमाता पुन्हा एकदा बेड्यांमध्ये अडकेल आणि पुन्हा एका पाकिस्तानची मागणी केली जाईल. त्यामुळेच भारत मातेला प्रमाण करताना मी हम दो हमारे पाचचं समर्थन करतो असं देखील भाजपा नेत्याने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.