पाटणा - केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांनी आपल्या नावात बदल केला आहे. आपल्या नावासमोर आपले गोत्र जोडणार असल्याची घोषणा गिरीराज सिंह यांनी केली होती. बिहारच्या नवादा मतदारसंघातील खासदार गिरीराज सिंह यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. आपण आपला देश वाचविण्यासाठी नाव बदलत आहोत, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
जगविख्यात लेखक विल्यम शेक्सपिअरने म्हटलं होतं, नावात कायं आहे ? पण नावासाठी आणि नाव मोठं होण्यासाठीचं राजकारण आपण नेहमीच पाहतो. आता, भाजप नेते खासदार गिरीराज सिंह यांनी आपल्या नावात बदल केला आहे. देश वाचविण्यासाठी सनातनला वाचविणे गरजेचे आहे. तर सनातनला वाचवायचा असल्यास आपण आपल्या ऋषी मुनींच्या मार्गावर चालायला हवं. त्यासाठी आपण आपल्या नावासमोर आपलं गोत्र जोडलं पाहिजे, असे सिंह यांनी म्हटले. तसेच, मी आजपासून माझे नाव ऋषी शांडिल्य यांच्या नावासोबत जोडत आहे. त्यामुळे आता, माझे नाव शांडिल्य गिरीराज सिंह असे आहे, असे ट्विट सिंह यांनी केलं आहे. दरम्यान, आपल्या वक्तव्यावरुन नेहमीच चर्चेत असलेल्या खासदार गिरीराज सिंह यांनी आता स्वत:च्या नावात बदल करुन लक्ष वेधले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गिरीराज सिंह यांनी 2047 साली पुन्हा एकदा भारताचे विभाजन होणार असल्याचे वक्तव्य केलं होतं.