नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन होऊन महिना उलटायला आला, तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यातच आता भाजप नेते आणि आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. विशेष मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्लीवारी करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मात्र भेटीची वेळ मिळू शकलेली नाही, असे सांगितले जात आहे.
शिंदे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. पण अचानक त्यांचा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. अमित शाह यांच्या भेटीची वेळ मिळत नसल्याने हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र व्यस्त कार्यक्रमात अचानक गिरीश महाजनांना भेटण्यास अमित शाह यांनी होकार दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खुद्द गिरीश महाजन यांनी या भेटीची माहिती ट्विटरवरून दिली आहे.
अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. विविध विषयांवर मुख्यतः नाशिक व जळगाव जिल्ह्यातील विषयांवर चर्चा केली, असे गिरीश महाजन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच अमित शाह यांच्या भेटीचे फोटोही शेअर केले आहेत. अमित शाह यांच्याकडे सहकार खाते आहे. अलीकडेच राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे वर्चस्व असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ राज्य सरकारने बरखास्त केले. तिथे भाजपचे आमदार आणि गिरीश महाजन यांचे समर्थक मंगेश चव्हाण यांना प्रशासक मंडळाचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी रात्री सर्वांना हुलकावणी देत दिल्लीत दाखल झाले आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून गुरुवारी पहाटे मुंबईला परत गेल्याची माहिती समोर आली आहे. राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार येत्या दोन-तीन दिवसांतच होईल, असा दावा भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. ते सध्या दिल्लीत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात कोणतीही अडचण नसल्याचा दावाही त्यांनी केला.