स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी देशवासीयांना केले आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त सरकारने ही मोहीम सुरू केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा'निमित्त ही मोहीम सुरू केल्याचे अमित शाह यांनी ट्विटच्या माध्यमांने म्हटले आहे. शाह म्हणाले, "या मोहिमेंतर्गत देशभरातील सुमारे 20 कोटी घरांवर तिरंगा फडकवला जाईल. जो प्रत्येक नागरिकाच्या, विशेषतः तरुणांच्या मनात देशभक्तीची ज्योत अधिक प्रखर करेल. मी सर्वांना 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवून या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करतो."
'तिरंग्याबद्दलचा सन्मान वाढवू शकू - शाह म्हणाले, या माध्यमाने आपल्याला आपल्या तरुणांच्या मनातील तिरंग्यासंदर्भातील सन्मान अधिक वाढवता येईल. याच बरोबर त्यांना स्वातंत्र्यासाठी संघर्ष केलेल्या आपल्या विरांच्या त्यागाबद्दलही माहिती देता येईल. याच बरोबर आपला राष्ट्रीय ध्वज आपल्याला केवळ एकतेच्या सूत्रातच बांधत नाही, तर आपल्यात राष्ट्राप्रती समर्पण करण्याची भावनाही बळकट करतो. 22 जुलै 1947 रोजीच तिरंग्याचे सध्याचे स्वरूप राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकार करण्याची घोषणा करण्यात आली होती.