रामगढ: गोमांस बाळगल्याच्या संशयावरुन तरुणाची हत्या करणाऱ्या 8 आरोपींना झारखंड उच्च न्यायालयानं जामीन दिला आहे. यानंतर केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सर्व आरोपींचं स्वागत केलं. यावेळी आरोपींना पुष्पहार घालण्यात आले आणि भाजपाच्या कार्यालयात मिठाईचं वाटप करण्यात आलं. यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.हत्या प्रकरणातील आरोपींच्या सुटकेसाठी माजी आमदार शंकर चौधरी यांनी आंदोलन केलं होतं. आरोपींना जामीन मिळाल्यानंतर चौधरी यांनी पत्रकार परिषदेत आनंद व्यक्त केला. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो, असं ते म्हणाले. गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरुन अलीमुद्दीन नावाच्या तरुणाची रामगढमध्ये जमावानं हत्या केली होती. या प्रकरणात 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या हत्याकांडात एक अल्पवयीन मुलाचा समावेश होता. त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयात अधिवक्ता बी. एन. त्रिपाठी यांनी सरकारची बाजू मांडली. जमावाकडून अलीमुद्दीनला मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओ पुरावा म्हणून स्वीकारण्यास न्यायालयानं नकार दिला. त्यामुळे आठजणांना जामीन मंजूर झाला. तर इतर तिघांनी जामिनासाठी अर्ज केला नव्हता. हत्या प्रकरणातील आरोपींची सुटका झाल्यानं माजी आमदार शंकर चौधरींनी आनंद व्यक्त केला. 'अधिवक्ता बी. एन. त्रिपाठी अगदी देवासारखे असून त्यांच्यामुळेच आमच्या 8 भावांना जामीन मिळाला,' असं चौधरी म्हणाले. सर्वांना जामीन मिळाल्यावर रामगढमध्ये भव्य विजयी यात्रा काढू, असंही त्यांनी सांगितलं.
हत्या प्रकरणातील आरोपींचं जयंत सिन्हांकडून स्वागत; भाजपा कार्यालयात मिठाई वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 7:30 AM