दक्षिणेत पंतप्रधान मोदींची लाट का नाही?; जेपी नड्डा यांनी केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 10:37 AM2021-03-13T10:37:17+5:302021-03-13T10:40:59+5:30
दक्षिण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची जादू का चालत नाही, असा प्रश्न भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना विचारण्यात आला.
चेन्नई: आताच्या घडीला देशात पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार सुरू आहे. त्या त्या ठिकाणचे पक्ष आणि केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (BJP) आपापली ताकद पणाला लावत आहे. भाजपने विजयरथाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर दक्षिण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची जादू का चालत नाही, असा प्रश्न भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना विचारण्यात आला. यावर, आता ही परिस्थिती राहिलेली नाही. दक्षिण भारतातील राज्यांमध्येही भाजप चांगली कामगिरी करत आहे, असे जेपी नड्डा यांनी सांगितले. (bjp leader jp nadda answers on why pm narendra modi magic not working in south india)
एका वृत्तवाहिनीशी बोलताना जेपी नड्डा यांना भाजपचा विजयरथ हा दक्षिण भारतात अडला आहे, या प्रश्नावर उत्तर देताना जेपी नड्डा म्हणाले की, पूर्वी असे घडत होते. मात्र, आताची परिस्थिती तशी नाही. दक्षिण भारतातील राज्यांतही भाजप चांगली कामगिरी करत आहे. तेलंगण येथे झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय झाला. हैदराबाद नगरपालिका निवडणुकांमध्येही भाजपने चांगली कामगिरी करून दाखवली आहे. कर्नाटकात भाजपचे सरकार आहे, असे जेपी नड्डा यांनी नमूद केले.
२ वर्षांत ५ हजारांहून अधिक डिलिव्हरी, उत्कृष्ट रेटिंग; Zomato ने घेतली 'त्या'चीच बाजू
पुदुच्चेरीत भाजपचे सरकार येईल
आगामी कालावधीत होऊ घातलेल्या केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी येथे भाजप चांगले प्रदर्शन करेल. पुदुच्चेरीमध्ये भाजपचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास जेपी नड्डा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत केरळमध्ये भाजपला चांगले यश मिळाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही पूर्ण तयारीनिशी आम्ही उतरत आहोत. सर्वपक्षीय भाजपविरोधात मैदानात आहेत. तरीही भाजप चांगली कामगिरी करेल, अशी आशा जेपी नड्डा यांनी व्यक्त केली.
सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास
तामिळनाडूमधील विधानसभा निवडणूक म्हणजे भाजपला स्वतःला सिद्ध करण्याची चांगली संधी आहे. तामिळनाडूतील राजकारणात भाजपची प्रतिमा आता बदलली असून, ती सकारात्मक झाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या योजना तामिळनाडूमध्ये यशस्वीरित्या अमलात आल्या आहेत, असे सांगत पंतप्रधान मोदी विकासाचे राजकारण करतात. तुष्टीकरणाचे नाही. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास, असाच पंतप्रधान मोदींचा मंत्र आहे. हाच अजेंडा दक्षिणेतील विधानसभा निवडणुकांमध्ये पुढे नेला जाईल, असे जेपी नड्डा यांनी स्पष्ट केले.