भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री तथा डीएमके चीफ एमके स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्मासंदर्भातील वक्तव्यावरून जोरदार हल्ला चढवला आहे. ''ही सनातन धर्म नष्ट करण्याची त्यांची राजकीय रणनीती आहे का?'' असा सवाल नड्डा यांनी केला आहे. ते मध्य प्रदेशातील चित्रकूटमध्ये 'जन आशीर्वाद यात्रेत' लोकांना संबोधित करत होते.
तत्पूर्वी, उदयनीधि स्टॅलिन यांनी कथितपणे म्हटले आहे की, आपण ज्या पद्धतीने डेंग्यू आणि मलेरिया संपवतो, त्याच पद्धतीने सनातनही नष्ट करा.
नड्डा म्हणाले, आज मध्य प्रदेश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. स्वच्छतेच्या बाबतीत राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. स्मार्ट सिटी आणि प्रधानमंत्री स्वामीत्व योजनेतही राज्य आघाडीवर आहे. भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येईल, हीच आमची हमी, हीच पंतप्रधान मोदींचीही गॅरंटी आहे.
भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या देशेने एनडीएची वाटचाल - विरोधकांच्या आघाडीवर निशाना साधताना जेपी नड्डा म्हणाले, "पीएम मोदींच्या मार्गदर्शनात एनडीए आघाडी भारताला एक विकसित राष्ट्र बनविण्यासाठी काम करत आहे. एकीकडे भारत चंद्र आणि सूर्याला जिंकण्याच्या कामात लागला आहे. तर दुसरीकडे, जेव्हा पहिल्यांदाच जी20 मध्ये सहभागी होण्यासाठी जगातील सर्वात शक्तीशाली लोक येत आहेत. तेव्हा इंडिया आघाडी आपली संस्कृती आणि धर्माला नुकसान पोहोचविण्याचे काम करत आहे. ही I.N.D.I.A आघाडी आहे की, 'घमंडिया' आघाडी," असा सवालही नड्डा यांनी यावेळी केला.