इंदूर - नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपाचे महासचिव आणि पश्चिम बंगालमधील पार्टीचे प्रदेशाध्यक्ष कैलाश विजयवर्गीय यांनी पुन्हा एकदा अजब विधान केलं आहे. पोहे खाण्याच्या पद्धतीवरून बांगलादेशींना ओळखलं असा दावा कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे. 'पोहे खाण्याच्या पद्धतीवरून मी बांगलादेशी मजुरांना ओळखलं' असं विजयवर्गीय यांनी एका सभेत म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (23 जानेवारी) इंदूरमध्ये एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सभेला संबोधित करताना भाजपाचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी पोहे खाण्याच्या पद्धतीवरून बांगलादेशी मजुरांना ओळखल्याचा अजब दावा केला आहे. 'काही दिवसांपूर्वी माझ्या घरातली एक खोली दुरुस्त करून घेतली. त्यावेळी कामावर असलेले मजूर पोहे खात होते. त्यांची खाण्याची पद्धत मला थोडी विचित्र वाटली. त्यामुळे कंत्राटदाराकडे ते मजूर बांगलादेशी आहेत का? याची चौकशी केली. त्या मजुरांनाही हाच प्रश्न विचारला. त्यानंतर ते कामावर आलेच नाहीत' असं विजयवर्गीय यांनी म्हटलं आहे.
कैलाश विजयवर्गीय यांनी 'या प्रकरणी मी अद्याप पोलिसांकडे कोणतीही तक्रार केलेली नाही. लोकांना जागरूक करण्यासाठी मी हे सांगत आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. नागरिकत्व कायदा देशाच्या भल्यासाठीच आहे. घुसखोर देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहेत' असं देखील म्हटलं आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची एकजूट होत आहे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
विजयवर्गीय यांनी काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील अधिकाऱ्यांना धमकी दिली होती. 'आमचे सरकार आल्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांना कोंबडा बनवू. ज्यांना कोंबडा बनवायचा आहे, अशा सर्व अधिकाऱ्यांची आम्ही यादी तयार केली आहे. तसेच, सरकारी अधिकाऱ्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास आम्ही शांत बसणार नाही. आम्ही सुद्धा बांगड्या घातल्या नाहीत. आम्ही इमानदारीने काम करत आहोत, याचा अर्थ असा नाही की आम्हाला मर्यादा तोडता येत नाहीत' असं कैलाश विजयवर्गीय यांना एका जनसमुदायाला संबोधित करताना म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra Bandh Live: वंचित आघाडीच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीहल्ला; अमरावतीत प्रचंड तणाव
Ind vs NZ, 1st T20 Live : न्यूझीलंड ३ बाद ११७, ग्रँडहोम आऊट
'मोटा भाई-छोटा भाईच्या तोंडी हिटलरची भाषा', मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
'कानाला आताच त्रास होतो आहे का?'; मशिदीवरील भोंगे हटविण्यावरुन राज ठाकरेंवर निशाणा
उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांचे फोन टॅपिंग प्रकरणी सरकारकडून चौकशीचे आदेश