इंदूर : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत राहणारे भाजपाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचा पुन्हा एकदा तोल सुटला आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी एका अधिकाऱ्याला धमकी देताना इंदूरला आग लावण्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कैलाश विजयवर्गीय हे इंदूरचे विभागीय आयुक्त आकाश त्रिपाठी यांची भेट घेणार होते. मात्र, त्यांनी भेटण्यास नकार दिला. त्यामुळे कैलाश विजयवर्गीय यांचा तोल सुटला आणि अधिकाऱ्याला थेट धमकी देताना म्हणाले,' अधिकारी आहात म्हणून नाहीतर इंदूरला आग लावली असती'.
दरम्यान, कैलाश विजयवर्गीय हे भाजपाचे मोठे नेते आहेत. त्यांचे पुत्र आकाश विजयवर्गीय हे सुद्धा आमदार आहेत. आकाश विजयवर्गीय यांनी जुन्या जीर्ण झालेल्या घराला पाडण्यासाठी आलेल्या इंदूर पालिकेच्या अधिकाऱ्याला चक्क बॅटने मारहाण केली होती. त्यावेळी ते चर्चेत आले होते. या प्रकरणी आकाश विजयवर्गीय यांना अटक झाली होती आणि जामीन मिळण्यापूर्वी काही दिवस तुरुंगाची हवाही खावी लागली होती.