'मिस इंडिया' स्पर्धेत दलित, आदिवासी आणि ओबीसी महिलांना स्थान मिळत नाही, या काँग्रेस खासदार तथा लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर, आता केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी राहुल गांधींवर 'बालबुद्धी' म्हणत थेट निशाणा साधला आहे. जात जनगणनेसंदर्भात वक्तव्य करून देशात फूट पाडण्याची गांधींची इच्छा असल्याचे रिजिजू यांनी म्हटले आहे.
'मागास समाजाची चेष्टा करू नका' -किरेन रिजिजू म्हणाले, राहुल गांधी देशात फूट पाडू शखत नाहीत. त्यांनी एक्सवर लिहिले, आता त्यांना (राहुल गांधी) मिस इंडिया स्पर्धा, चित्रपट आणि खेळांतही आरक्षण हवे आहे! हा केवळ 'बालबुद्धीचा' मुद्दा नसून त्याचा जयजयकार करणारे लोकही तेवढेच जबाबदार आहेत! बालबुद्धी मनोरंजनासाठी चांगली असू शकते, मात्र आपल्या फुटीच्या चालीत, आमच्या मागास समाजाची चेष्टा करू नका.
"मिस इंडिया उमेदवारांची निवड सरकार करत नाही" -रिजिजू म्हणाले, सरकार मिस इंडियासाठी उमेदवारांची निवड करत नाही. ना ऑलिम्पिकसाठी खेळाडूंची अथवा चित्रपटांसाठी अभिनेत्यांची निवड सरकार करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्पष्ट केले आहे की, सर्वोच्च न्यायालयाला IAS, IPS, IFS आणि इतर सर्व उच्च सेवांसाठी आरक्षणात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
काय म्हणाले होते राहुल गांधी? -उत्तर प्रदेशातील 'संविधान सन्मान संमेलना'दरम्यान राहुल गांधी म्हणाले होते, "मी मिस इंडियाची यादी बघितली. त्यात कुणीही दलित, आदिवासी अथवा ओबीसी महिला नाही. काही लोक क्रिकेट किंवा बॉलिवूडबाबत बोलतील. कुणी मोची किंवा प्लंबर दाखवणार नाही." एवढंच नाही तर, "प्रसारमाध्यमांमधील आघाडीच्या अँकर्समध्येही ९० टक्क्यांमधील कुणी नाही," असा दावाही राहुल गांधी यांनी केला होता.