नवी दिल्ली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या माफिया सेनेची इज्जत गेली आहे. गोवा, उत्तर प्रदेशातील जनतेने त्यांना दाखवून दिलं आहे. संजय राऊत यांच्यामार्फत स्टंट करून काहीही साध्य होत नाही. नील सोमय्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकारनं नील सोमय्यांची कुठलंही चौकशी करत नसल्याचं सांगितले. उच्च न्यायालयात ठाकरे सरकारनं स्वत:ची इज्जत घालवून घेतली असा टोला भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्यांनी(BJP Kirit Somaiya) शिवसेनेला(Shivsena) लगावला.
किरीट सोमय्यांनी राऊतांवर निशाणा साधला ते म्हणाले की, संजय राऊत यांनी नील सोमय्यांविरोधात दिलेल्या कागदपत्रांचे पुढे काय झाले? हायकोर्टाने ठाकरे सरकारला लोटांगण घालावे लागले. नीलवर तुम्ही जो अत्याचार केला त्याचा हिशोब सोमय्या नक्की घेणार असा इशारा त्यांनी शिवसेना आणि संजय राऊतांना दिला. त्याचसोबत राऊत तुमच्या माफिया सेनेत दम असेल तर मला हात लावून दाखवा. पुण्यात शिवसेनेनं ७७ गुंड मला मारण्यासाठी पाठवले त्यातील ३० मुंबईतले होते असा आरोपही सोमय्यांनी केला.
काय आहे प्रकरण?
शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनी नील सोमय्या यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते. त्या आरोपांची चौकशी मुंबई पोलीस करणार असल्याचं ते म्हणाले. इतकेच नाही तर बाप-बेटा जेलमध्ये जाणार असल्याचंही राऊतांनी दावा केला होता. या आरोपानंतर नील सोमय्यांनी अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात अर्ज सादर केला होता. मात्र महाराष्ट्र सरकारने मुंबई हायकोर्टात दिलेल्या माहितीनंतर सोमय्यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. सरकारनं हायकोर्टात म्हटलं की, नील सोमय्यांविरोधात कुठलीही प्राथमिक चौकशी सुरू नाही. किंवा वसई निकॉन इन्फ्राचे संचालक असलेल्या नील सोमय्यांवर गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे अटकपूर्व जामीनाची गरज नाही. त्यानंतर नील सोमय्यांनी हायकोर्टातून याचिका मागे घेतली आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी वाधवान आणि सोमय्यांच्या संबंधांच्या तारखा मांडल्या. सोमय्या यांनी जून २०१५ मध्ये एचडीआयएल आणि जीव्हीके कंपनीने मुंबई विमानतळाची ६३ एकर जमीन हडपल्याचा आरोप केला होता. त्यासाठी एमएमआरडीमध्ये सोमय्या यांनी सातत्याने तक्रारी केल्या. पीएमसी बँक आणि पत्राचाळ प्रकरणातील राकेश वाधवान यांना ब्लॅकमेल करून किरीट सोमय्या यांनी पैसे उकळले आहेत. वाधवान विरोधात सोमय्यांनी आरोपांची, तक्रारींची मालिका चालविली होती. पण, २०१६ मध्ये अचानक वाधवान यांच्या विरोधातील तक्रारी थांबल्या आणि त्याच वर्षी नील सोमय्या भागीदार बनले. सिरियल किलर वगैरे असतात तसे सोमय्या हे सिरियल कम्प्लेनर आहेत असा आरोप संजय राऊतांनी केला होता.