गेल्या 5 वर्षांत संसदेत किती शब्द बोलले आडवाणी; आकडेवारी पाहून धक्का बसेल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 01:28 PM2019-03-22T13:28:05+5:302019-03-22T13:29:26+5:30

यंदा आडवाणींना गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाही

bjp leader lal krishna advani spoken 365 words in last 5 years in parliament | गेल्या 5 वर्षांत संसदेत किती शब्द बोलले आडवाणी; आकडेवारी पाहून धक्का बसेल 

गेल्या 5 वर्षांत संसदेत किती शब्द बोलले आडवाणी; आकडेवारी पाहून धक्का बसेल 

googlenewsNext

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. भाजपाकडून यंदा लालकृष्ण आडवाणी यांना संधी दिली जाणार का, याबद्दलची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्यानं उमेदवार यादीबद्दल मोठी उत्सुकता होती. मात्र भाजपा अध्यक्ष अमित शहांना गांधीनगरमधून उमेदवारी देण्यात आली. गांधीनगर हा आडवाणींचा मतदारसंघ आहे. 1998 पासून ते या मतदारसंघाचे खासदार आहेत. मात्र शहांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी आडवाणींचा पत्ता कापण्यात आला. भाजपाला शून्यापासून 182 जागांपर्यंत नेणाऱ्या आडवाणींना गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यानं बाजूला सारलं जात असल्याचं चित्र दिसून आलं आहे. 

कधीकाळी भाजपाच्या प्रखर हिंदुत्वाचे पोस्टरबॉय मानले जाणारे लालकृष्ण आडवाणी आता फार शांत राहू लागले आहेत. भाजपा विरोधी पक्षात असताना संसदेत आक्रमक भाषणं करणाऱ्या आडवाणींचा आवाज आता फारसा ऐकूही येत नाही. विरोधात असताना संसद गाजवणाऱ्या आडवाणींचा आवाज गेल्या 5 वर्षात अतिशय क्षीण झाला आहे. विशेष म्हणजे या काळात भाजपाची सत्ता आहे आणि पक्षाकडे संपूर्ण बहुमत आहे. त्यामुळे 'मार्गदर्शक मंडळातले' आडवाणी शांत का, ते संसदेत का बोलत नाही, याची विरोधकांसह भाजपामध्येही चर्चा आहे. मात्र ही चर्चा अतिशय दबक्या आवाजात होते. आडवाणी किती कमी बोलतात, याची आकडेवारी अतिशय धक्कादायक आहे.

पंधरावी लोकसभा (2009 ते 2014) आणि सोळावी लोकसभा (2014-19) यांचा विचार केल्यास हे अगदी स्पष्टपणे जाणवतं. गेल्या लोकसभेच्या तुलनेत संसदेतील आडवाणींचे शब्द जवळपास 99 टक्क्यांनी कमी झाले आहेत. गेल्या पाच वर्षात आडवाणी संसदेत 296 दिवस उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीची टक्केवारी काढल्यास ती 90 टक्क्यांहून जास्त आहे. मात्र या काळात ते फक्त 365 शब्द बोलले. कधीकाळी संसदेत धडाडणारी, सत्ताधाऱ्यांना धडकी भरवणारी भाजपाची ही तोफ आता अगदी थंड झाली आहे. ज्या पक्षासाठी जीवाचं रान केलं, तो पक्ष पूर्ण बहुमतासह सत्तेत येऊनही आडवाणींना फारसं बोलता येत नाही.

लालकृष्ण आडवाणी यांचा आक्रमक अवतार संसदेनं अनेकदा पाहिला. 8 ऑगस्ट 2012 रोजी आसाममधील घुसखोरी आणि राज्यात होणारा हिंसाचार यावर स्थगन प्रस्ताव आणण्यात आला. यावरील चर्चेवेळी संसदेत भाजपाचं नेतृत्त्व आडवाणी यांनी केलं. त्यावेळी संसदेत प्रचंड गदारोळ झाला. लोहपुरुष आडवाणींनी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वाखालील यूपीए सरकारला अडचणीत आणलं. साडेसहा वर्षांपूर्वी आडवाणींनी केलेल्या त्या भाषणात सत्ताधाऱ्यांनी 50 वेळा व्यत्यय आणला. मात्र भाजपाची मुलूखमैदान तोफ धडाडतच होती. त्या भाषणाचा हिशोब मांडल्यास आडवाणी 4 हजार 957 शब्द बोलले होते. 

यानंतर 2014 मध्ये देशात निवडणूक झाली. सत्तांतर झालं. भाजपाला संपूर्ण बहुमत मिळालं. त्यानंतर आडवाणींचं धडाकेबाज भाषण काही पाहायला मिळालं नाही. अगदी महिन्याभरापूर्वी लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला होता. मोदी सरकारनं संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मांडलं. हे विधेयक मंजूर झाल्यावर त्याचे आसामवर राजकीय, सामाजिक परिणाम होणार होते. त्यावेळी लोकसभेत गोंधळ सुरू असताना आडवाणी अगदी शांत होते. ते एकही शब्द बोलले नाहीत. 
 

Web Title: bjp leader lal krishna advani spoken 365 words in last 5 years in parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.