कोलकाता:पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) विधानसभा निवडणुकांनंतर मोठ्या प्रमाणात सुरु झालेला हिंसाचार अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजप (BJP) नेत्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी ट्विट करून यामागे तृणमूल काँग्रेस (TMC) असल्याचा आरोप केला आहे.
भाजप युवा मार्चाचे नेते मिथुन घोष यांची उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इटाहार येथे अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मिथुन घोष ३२ वर्षांचे होते. यानंतर भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी एक ट्विट करत यामागे तृणमूल काँग्रेस असून, पश्चिम बंगालमधील हिंसाचारालाही जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
भाजप मिथुन घोषचे योगदान कधीही विसरणार नाही
सुवेंदू अधिकारी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, भाजप युवा मोर्चाचे नेते मिथुन घोष यांची इटाहार येथे गोळी झाडून हत्या करण्यात आली. या हत्येमागे टीएमसीचा हात आहे. असामाजिक तत्वांनी आपल्या मालकाच्या आदेशावरून ही हत्या घडवून आणली आहे. मिथुन घोष यांचे योगदान भाजप कधीही विसरणार नाही. योग्य वेळ आली की, याला योग्य प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा सुवेंदू अधिकारी यांनी दिला.
दोन हल्लेखोरांची नावे समोर
रविवारी रात्री ११ वाजता मिथुन घोष आपल्या घरासमोर उभे होते. तेव्हा अचानक दोन अज्ञात व्यक्ती मोटरसायकलवरून आल्या आणि घोष यांच्यावर गोळ्या झाडून पसार झाल्या. जखमी अवस्थेतील घोष यांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या हल्ल्यामागे सुकुमार घोष आणि संतोष महतो यांची नावे समोर आली आहेत. मृत्यूपूर्वी मिथुन घोष यांनी या दोघांची नावे घेतल्याचा दावा घोष यांचे बंधू अजित घोष यांनी पोलिसांसमोर केला आहे.
दरम्यान, उत्तर दिनाजपूर भागात यामुळे खळबळ उडाली आहे. मिथुन घोष यांना जीवे मारण्याची धमकी यापूर्वी देण्यात आली होती, असा दावा उत्तर दिनाजपूरचे भाजप जिल्हाध्यक्ष बासुदेव सरकार यांनी केला आहे. पोलीस, प्रशासनाकडे तक्रार करूनही यासंदर्भात काही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोपही सरकार यांनी केला आहे. तसेच टीएमसीने भाजपने केलेले सर्व आरोप आणि दावे फेटाळून लावले आहेत.