नवी दिल्ली - काँग्रेसने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियामध्ये चौकीदार चोर है असं कॅम्पेन उघडलं होतं. मात्र आता याच कॅम्पेनला प्रत्युत्तर म्हणून भाजपाकडून #MainBhiChowkidar या कॅम्पेनची सुरुवात करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटचे 'चौकीदार नरेंद्र मोदी' असे नवीन नाव ठेवण्यात आले आहे. भाजपाच्या अनेक मंत्र्यांनी, मोठ्या नेत्यांनी तसेच भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी देखील 'चौकीदार अमित शाह' असे नाव ठेवले आहे. भाजपाच्या या मोहिमेला माजी केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर यांनी देखील पाठिंबा दिला. मात्र अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी यावरून एम.जे.अकबर यांच्यावर टीका केली आहे. 'तुम्ही चौकीदार असाल तर महिला असुरक्षितच' असा टोला रेणुका यांनी लगावला आहे.
एम. जे. अकबर यांनी 'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मै भी चौकीदार या मोहिमेला पाठिंबा देताना मला अभिमान वाटत आहे. भारताचा नागरिक म्हणून मी देशांतील भ्रष्ट्राचार, दहशतवाद, गरिबी दूर करण्यासाठी आणि एक नवा भारत घडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असेल' असं ट्वीट करत या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी एम. जे. अकबर यांचं ट्वीट रिट्वीट करत तुम्ही चौकीदार असाल तर महिला असुरक्षितच असतील असं म्हणत टीका केली आहे.
एम.जे. अकबर यांच्यावर अनेक महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. एम.जे. अकबर यांच्याविरोधात पहिली तक्रार प्रिया रमणी यांनी केली होती. त्यानंतर गझला वहाब, साबा नकवी, शुतापा पॉल, शुभा राहा, सुपर्णा शर्मा व प्रेरणा सिंग बिंद्रा यांनीही अकबर यांच्याविरोधात लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्या आहेत. या सर्व महिला पत्रकारांनी अकबर यांच्या हाताखाली काम केले होते.
पंतप्रधान मोदींसह भाजपचे सर्वच नेते झाले "चौकीदार"लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. तीन मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये मै भी चौकीदार असा प्रमुख उल्लेख करण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्या चौकीदार चोर है या घोषणेला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलं. त्यामध्ये मोदी म्हणाले की, मी देशाची सेवा करण्यासाठी चौकीदार आहे. पण मी एकटा चौकीदार नाही तर भ्रष्टाचाराविरोधात लढणारा प्रत्येक जण चौकीदार आहे. जो देशाची प्रगती करण्यासाठी मेहनत करतोय, तो चौकीदार आहे. आज देशातील प्रत्येक नागरिक चौकीदार आहे असं म्हणत मै भी चौकीदार ही मोहीम ट्वीटरवर सुरू केली आहे.