नवी दिल्ली - समाजवादी पार्टीला सोडचिठ्ठी देऊन भाजपा प्रवेश केल्यानंतर नरेश अग्रवाल यांनी नेत्या व अभिनेत्री जया बच्चन यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली. सर्व स्तरातून शाब्दिक फटकार मिळाल्यानंतर नरेश अग्रवाल यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी खेद व्यक्त केला. समाजवादी पार्टीकडून राज्यसभेवर न पाठवल्यामुळे नाराज झालेल्या नरेश अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर नरेश अग्रवाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ''मी भाजपात प्रवेश करत आहे. राष्ट्रीय पक्षामध्ये न राहता देशासमोर स्वतःची भूमिका ठेवता येणार नाही असं ते म्हणाले. तसंच समाजवादी पक्षाविरोधात राग व्यक्त करताना सिनेमामध्ये नाचणा-यांसाठी माझं तिकीट कापलं'', असे वादग्रस्त विधान त्यांनी केले.
समाजवादी पक्षाने नरेश अग्रवाल आणि किरणमय नंदा यांना डावलून जया बच्चन यांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी दिली होती. दुसरीकडे, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नरेश अग्रवाल यांचं स्वागत केलं. पण त्याचसोबत त्यांनी जया बच्चन यांच्याबाबत केलेल्या टीकेचं कधीही समर्थन होऊ शकत नाही, असंही स्पष्ट केले.
अग्रवाल यांनी व्यक्त केला खेद दरम्यान, मंगळवारी अग्रवाल यांनी जया बच्चन यांच्यासंदर्भात केलेले वादग्रस्त विधानाप्रकरणी चौफेर टीका झाल्यानंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ''माझ्या विधानामुळे कोणापुढे कोणतीही समस्या निर्माण झाली असल्यास मी त्याबाबत खेद व्यक्त करतो. समाजवादी पार्टीला मला तिकीट देणं योग्य वाटले नाही आणि त्यांनी जया यांना तिकीट दिलं. मला कोणत्याही वादामध्ये अडकायचे नाही आणि मी केलेल्या विधानाप्रकरणी खेद व्यक्त करतो''.
''माझ्या विधानाचा प्रसिद्धी माध्यमांनी वेगळ्या पद्धतीनं दाखवलं. मला कोणाला दुःख पोहोचवण्याचा हेतू नव्हता. मी माझे शब्द मागे घेतो'',असे पत्रकारांसोबत संवाद साधताना त्यांनी म्हटले आहे.