नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी "देशात आज जर युपीएचं सरकार असतं, तर आम्ही चीनला बाहेर फेकून दिलं असतं, त्यासाठी फक्त 15 मिनिटांचाही वेळ आम्हाला लागला असता" असं म्हटलं आहे. राहुल गांधींच्या या विधानावरून भाजपाच्या एका नेत्याने वादग्रस्त विधान केलं आहे. "राहुल गांधींना इतकी हाय क्वालिटी नशा मिळते तरी कुठून?" असं भाजपा नेते आणि मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी कृषी कायदा आणि भारत चीन तणावावरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यावरून नरोत्तम मिश्रा राहुल गांधींबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. "10 दिवसांत कर्जमाफी, चीनला 15 मिनिटांत बाहेर करणं. ज्यांनी राहुल गांधींना हे शिकवलंय त्यांना मी सॅल्यूट करतो. राहुल गांधी यांनी इतकी हाय क्वालिटी नशा मिळते तरी कुठून?" असं म्हणत नरोत्तम मिश्रा यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला आहे.
'आम्ही सत्तेत असतो, तर चीनला 15 मिनिटांत बाहेर फेकून दिलं असतं'
राहुल गांधींनी नव्यानेच बनवलेल्या कृषी कायद्याविरोधात आपली भूमिका मांडली होती. तेथील शेतकऱ्यांच्या बाजुने काँग्रेससह इतरही मित्रपक्ष असल्याचे आश्वासन देत, मोदी सरकारवर टीका केली. मोदी सरकार हे शेतकरी, कामगार व गरिबविरोधी सरकार असून अदानी आणि अंबानींचं हित जोपसणारे असल्याची टीकाही राहुल यांनी केली. हाथरस बलात्कार प्रकरण, कृषी कायदे, लॉकडाऊनमधील समस्या, कोरोनातील अपयश यांसह लडाख सीमारेषेवरील भारत-चीन वादावरही राहुल यांनी भाष्य केले. यावेळी, बोलताना चीनने भारताच्या हद्दीत प्रवेश केला असून मोदी सरकार गप्प असल्याचे ते म्हणाले होते. तसेच, देशात आजमित्तीला युपीएचं सरकार असतं, तर आम्ही चीनला बाहेर फेकून दिलं असतं, त्यासाठी 15 मिनिटांचाही वेळ आम्हाला लागला नसता, असेही राहुल यांनी म्हटलं होतं. त्यावर आता नरोत्तम मिश्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'मी मास्क घालत नाही' म्हणणाऱ्या भाजपा नेत्याचा यू-टर्न, म्हणाले...; Video व्हायरल
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी याआधी मास्क संदर्भात एक विधान केल्याने वाद निर्माण झाला होता. नरोत्तम मिश्रा यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र त्यावेळी त्यांनी मास्क लावला नव्हता. पत्रकारांनी जेव्हा त्यांना आपण मास्क का लावला नाही असा प्रश्न विचारला त्यावर त्यांनी आपण अशा कार्यक्रमांमध्ये मास्क घालत नाही, त्याने काय होतं? असं उत्तर दिलं होतं. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. मिश्रा यांच्या विधानानंतर नवा वाद निर्माण झाला असून अनेकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. जोरदार टीका झाल्यानंतर मंत्र्यांनी यू-टर्न घेतला.
"मी माझी चूक स्वीकारली असून आता मास्कचा वापर करणार"
विरोधकांनी मास्कवरून निशाणा साधल्यावर नरोत्तम मिश्रा यांनी या विधानावर माफी मागितली. ट्विटरवरून त्याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मिश्रा यांनी "मी माझी चूक स्वीकारली असून आता मास्कचा वापर करणार आहे. तसेच कोरोनाच्या संकटात लोकांनी देखील मास्कचा वापर केला पाहिजे. तसेच सोशल डिस्टंसिंगचं पालन केलं पाहिजे असं मी लोकांना आवाहन करतो" असं म्हटलं होतं. तसेच याबाबतचा एक व्हिडीओही पोस्ट केला होता.