Azaan Allah and BJP Leader K. S. Eshwarappa: कर्नाटकातील मंगळुरू येथे एका सभेला संबोधित करताना भाजपचे दिग्गज नेते केएस ईश्वरप्पा यांनी अजानबाबत मोठे विधान केले. जेव्हा केएस ईश्वरप्पा भाषण देत होते, तेव्हाच मशिदीतून अजान सुरू झाली. यानंतर केएस ईश्वरप्पा यांनी भाषणा दरम्यानच अजानवर भाष्य करण्यास सुरुवात केली. के. एस. ईश्वरप्पा यांनी अजानला 'डोकेदुखी' असल्याचं संबोधलं. "अल्लाह बहिरा आहे का, की त्याचं स्मरण करण्यासाठी माईकवरून ओरडावं लागतं. मी कुठेही जातो, तेव्हा ही माझ्यासाठी मोठी डोकेदुखी असते. सर्वोच्च न्यायालयाने यावर निकाल दिला आहे. त्यामुळे आज ना उद्या ही गोष्ट नक्कीच बंद होईल. कोणीही मनात शंका बाळगू नका. सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे, हे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच शिकवले आहे," असे विधान करत ईश्वरप्पा यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे.
भाजप नेते केएस ईश्वरप्पा म्हणाले, "माईकवर ओरडूनच अल्लाह ऐकतो का? आम्ही आमच्या मंदिरात पूजा-अर्चा करतो. भजन करतो, महिलावर्ग श्लोक म्हणतात, जप करतात. या विश्वातील भक्तीच्या बाबतीत आपली भारत माता सर्वश्रेष्ठ आहे. पण माईकवर नुसते ओरडूनच अल्लाहला ऐकू येत असेल तर अल्ला बहिरे आहे का हे मला विचारावे लागेल. पण मला वाटत नाही की या सगळ्याची काही गरज आहे. कारण मी या आधीही सांगितले होते की हा मुद्दा लवकरच निकालात काढला जाईल," असेही ते म्हणाले.
अजानवरून गेल्या काही दिवसांत बरेच वाद
लाऊडस्पीकरवरून दिलेली अजान हा बऱ्याच काळापासून चर्चेचा विषय आहे. सोनू निगमपासून ते राज ठाकरेंपर्यंत अनेकांनी यावर वक्तव्ये केली आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर हटवण्यात आले. लाऊडस्पीकर वाजवण्याची ठराविक वेळ पाळण्यात आली. याशिवाय राज ठाकरेंनीही महाराष्ट्रात लाऊडस्पीकरविरोधातही मोहिम उघडली. त्यानंतर बरेच ठिकाणी भोंगे उतरवण्यात आल्याचेही सांगितले जाते.