रांची : एका दिव्यांग मोलकरणीचा छळ केल्याच्या आरोपावरून भाजपने झारखंडमधील नेत्या सीमा पात्रा यांना निलंबित केले आहे. पात्रा या महिला शाखेच्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या सदस्य होत्या. सीमा पात्रा यांचे पती महेश्वर पात्रा हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. या मोलकरणीवरील अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झारखंडचे भाजपचे प्रमुख दीपक प्रकाश यांनी पात्रा यांच्यावर कारवाईचे आदेश दिले.
या व्हिडिओमध्ये सुनीता ही महिला हॉस्पिटलच्या बेडवर दिसत आहे. तिचे अनेक दात पडलेले आहेत. ती उठून बसण्यास असमर्थ आहे. तिच्या शरीरावर दुखापतीच्या खुणा दिसत आहेत. यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून पात्रा यांना अटक करण्याची मागणीही होत आहे. सुनीता (२९) या झारखंडमधील गुमला येथील असून दहा वर्षांपासून पात्रा यांच्याकडे घरकाम करत आहेत. आपली काय चूक होती हे मला माहिती नाही, असे सुनीता यांनी सांगितले.
असा केला छळ सुनीता यांनी आरोप केला आहे की, पात्रा यांनी क्रूरपणे छळ केला. गरम तव्याने पोळविले आणि रॉडने मारहाण केली. यात आपले दात तुटले. एवढेच काय, फरशीवरील मूत्र चाटण्यासही भाग पाडले. अनेक वर्षांपासून आपल्याला घरात कोंडले होते.