कोलकाता:पश्चिम बंगालमध्येतृणमूल काँग्रेसने सत्ता राखल्यामुळे मोठ्या उत्साहात भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केलेल्या अनेक नेतेमंडळींचा अपेक्षाभंग झाल्याची चर्चा सुरू आहे. यातच पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपला पुन्हा चितपट करत मुख्यमंत्री पदही राखले. त्यानंतर आता अनेक तृणमूल काँग्रेसमधील (TMC) नेत्यांची घरवापसी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता ममता सरकारमधील मंत्रिपद सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राजीव बॅनर्जी (Rajib Banerjee) यांनी पक्षाला रामराम करत पुन्हा एकदा टीएमसीमध्ये घरवापसी केली आहे.
तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत त्रिपुरा येथील एका जनसभेत राजीव बॅनर्जी यांनी टीएमसीमध्ये घरवापसी केली. राजीव बॅनर्जी यांचा टीएमसीमध्ये झालेला प्रवेश हा भाजपसाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. एवढेच नव्हे तर भाजपमधील आणखी काही नेते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तृणमूल काँग्रेसने भाजपला मात देत सत्ता कायम राखल्यानंतर अनेकांनी यापूर्वी टीएमसीमध्ये प्रवेश केला होता.
घरवापसी झाल्यावर राज्यसभेवर पाठवले
अलीकडेच काँग्रेस नेत्या सुष्मिता देव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर टीएमसीकडून त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. याशिवाय आणखी अनेक भाजप नेते टीएमसीमध्ये प्रवेश करतील, असा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी गोवा दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेसने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याचबरोबर नफीसा अली आणि मृणालिनी देशप्रभु यांनीदेखील टीएमसीमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, ममता बॅनर्जी तीन दिवसाच्या गोवा दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यादरम्यान मच्छीमारांना आणि नागरिकांना भेटून टीएमसीच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठकही त्यांनी घेतली. तसेच आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व ४० जागांवर तृणमूल काँग्रेस उमेदवार देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.