नवी दिल्ली - लोकसभा 2019 ची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तस तशी राजकीय पक्षांच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. प्रचारसभांमधून अनेक नेते एकमेकांवर घणाघाती टीका करताना पाहायला मिळत आहेत. प्रचारसभेतील भाषणं आणि किस्से सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सभेदरम्यान व्यासपीठावर अनेकांना बोलण्याची संधी दिली जाते तर काही वेळा प्रोटोकॉलमुळे अनेकांना भाषण करता येत नाही. काही दिवसांपूर्वी भाजपाचे खासदार दिलीप गांधी हे नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी भाषण थांबवल्याने भावुक झाले होते. असाच एक प्रकार हरयाणातील पलवलमध्ये पाहायला मिळाला आहे. व्यासपीठावर बोलण्याची संधी न मिळाल्याने एका भाजपा नेत्याला अश्रू अनावर झाले आहेत.
हरयाणातील पलवलमध्ये रविवारी (14 एप्रिल) मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्या विजय संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीसाठी मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्यासह भाजपाचे अनेक नेते व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधी काही नेत्यांना भाषण करण्याची संधी देण्यात आली होती. व्यासपीठावर हसनपूरचे माजी आमदार रामरतन हे देखील उपस्थित होते. त्यांना सभेत भाषण करायचे होते. मात्र रामरतन यांनी खूप वेळ बोलण्याची संधी मिळेल म्हणून वाट पाहिली. पण त्यांना भाषण करण्याची संधी मिळालीच नाही. या संपूर्ण प्रकारामुळे भावुक झालेले रामरतन व्यासपीठावरच रडायला लागले.
रामरतन यांना रडताना पाहून व्यासपीठावर असलेल्या भाजपाच्या काही नेत्यांनी यामागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रामरतन काहीच न बोलता केवळ डोळ्यातील अश्रू पुसताना दिसले. या घटनेचा एक व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे. पत्रकारांनी रामरतन यांच्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी प्रोटाकॉलचे कारण दिले आहे. प्रोटोकॉलमुळे रामरतन यांचा नंबर न आल्याने त्यांना भाषण करण्याची संधी मिळाली नसल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
अन्...खासदार दिलीप गांधी भडकलेकाही दिवसांपूर्वी भाजपाचे खासदार दिलीप गांधी हे नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी चांगलेच चिडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेस्थळी पोहोचण्यापुर्वी काही वेळ अगोदर हा प्रसंग घडला होता. मात्र, उमेदवार डॉ. सुजय विखेंनी सर तुम्ही बोला अशी विनंती केल्यानंतर गांधी पुन्हा बोलायला लागले. पण, बोलताना त्यांचा कंट दाटला होता. मनस्वी आलेला राग गिळताना दिलीप गांधींच्या डोळे पाणावल्याचे कॅमेऱ्यात टिपले गेले. भावूक झालेल्या दिलीप गांधींची नाराजी या निमित्ताने पुन्हा एकदा नगरमध्ये चर्चेचा विषय बनली होती.
खासदार दिलीप गांधी यांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी भाषण थांबविण्यास सांगितले. यावेळी दिलीप गांधी चांगलेच भडकले होते. गांधी म्हणाले, दोन मिनिटांत, मी 10 मिनिटे बोलतो. नाहीतर मला बोलायचं नाही, असे म्हणत गांधी सभेतून निघून जात होते. त्यावेळी डॉ. सुजय विखे यांनी सर तुम्ही बोला, म्हणत गांधींना भाषण सुरू ठेवण्याची विनंती केली. त्यानंतर भाषणात दिलीप गांधी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड उपस्थित होते.