“देशाच्या लष्कराचा अपमान करू नका..,” सर्जिकल स्ट्राईकवरील प्रश्नांवर प्रसाद यांचे काँग्रेसला खडेबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 02:02 PM2023-01-24T14:02:36+5:302023-01-24T14:04:19+5:30
“ते सर्जिकल स्ट्राईकबद्दल बोलत आहेत, पण त्यांनी कोणतेही पुरावे दिले नाहीत,” असं वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केलं होतं.
“काँग्रेस पक्ष वारंवार सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे,” अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी दिली. “हे तेच दिग्विजय सिंह आहेत, ज्यांनी बाटला हाऊस एन्काऊंटरवर प्रश्न उपस्थित केले होते. माझा राहुल गांधींना प्रश्न आहे, तुमच्यासोबत जे लोक आहेत… ते देश तोडण्याचा प्रयत्न करतायत आणि तुम्ही शांत आहात? नेत्यांच्या अशा वक्तव्यानं दहशतवाद्यांचं मनोबल वाढतं याचं विचार कधी तुम्ही केलाय का? ही भारत जोडो यात्रा आहे की भारत तोडो?” असं म्हणत रविशंकर प्रसाद यांनी खडेबोल सुनावले.
“हे अत्यंत लज्जास्पद आणि दुर्दैवी आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना माफी मागावी लागेल. ही पुरावा गँग देशाला तोडण्याचं काम करतेय आणि या नेत्यांना काँग्रेस पक्षातील बड्या नेत्यांचा पाठिंबा आहे. दिग्विजय सिंह हे काही सामान्य नेते नाहीत, ते दहा वर्षे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत, सरचिटणीस होते. देशाच्या सैन्याचा अपमान करू नका,” असे रविशंकर प्रसाद म्हणाले.
दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केले होते प्रश्न
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सोमवारी सर्जिकल स्ट्राईकवर पुन्हा प्रश्न उपस्थित केले होते. तसंच सरकार खोटं बोलत असल्याचा आरोपही केला होता. जम्मू आणि काश्मीरमधील 'भारत जोडो यात्रे' दरम्यान एका जाहीर सभेला संबोधित करताना सिंह यांनी आरोप केला की, “सरकारने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) कर्मचाऱ्यांना श्रीनगरहून दिल्लीला एअरलिफ्ट करण्याची (CRPF) विनंती मान्य केली नाही आणि २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवानांना बलिदान द्यावे लागले.”
“ते सर्जिकल स्ट्राईकबद्दल बोलतात. ते अनेकांना मारल्याबद्दल बोलतात पण त्यांनी कोणताही पुरावा दिलेला नाही. ते खोट्या गोष्टींच्या सहाय्यानं राज्य करत आहेत,” असंही ते म्हणाले होते.