कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाला धक्क्यांवर धक्के बसू लागले आहेत. निवडणुकीआधी तृणमूल काँग्रेसला गळती लागली होती. तृणमूलमधील अनेक मोठे नेते भाजपमध्ये गेले. मात्र आता यातील अनेक नेत्यांनी पुन्हा तृणमूलची वाट धरली आहे. राज्यातील तृणमूलचं सरकार कायम राहिल्यानं अनेक नेत्यांनी घरवापसी केली आहे. भाजपचे राज्य सचिव सब्यसाची दत्ता लवकरच तृणमूलमध्ये प्रवेश करणार आहेत.
विधाननगरचे माजी महापौर दत्ता गेल्या काही दिवसांपासून तृणमूलच्या नेतृत्त्वाच्या संपर्कात आहेत. २०१९ मध्ये दुर्गापूजेच्या आधी दत्ता यांनी टीएमसीची साथ सोडत कमळ हाती घेतलं. आता दोन वर्षांनंतर दत्ता स्वगृही परतणार आहेत. दसऱ्याच्या आसपास त्यांचा पक्षप्रवेश होईल. काही दिवसांपूर्वीच भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियोंनी भाजपला रामराम करत तृणमूलची वाट धरली. सुप्रियो यांच्याकडे असलेलं मंत्रिपद काढून घेण्यात आल्यानं ते नाराज होते.
विधानसभा निवडणुकीत भाजपनं चांगलं यश मिळवलं. मात्र त्यांना सत्ता मिळवता आली नाही. विधानसभा निवडणूक निकालानंतर अनेक नेत्यांनी घरवापसी केली. यामध्ये मुकूल रॉय, विष्णूपूरचे आमदार तन्मय घोष, कालियागंजचे आमदार सौमेन रॉय, बागडाचे आमदार विश्वजीत दास यांचा समावेश आहे.