भोपाळ: मध्य प्रदेशात पुन्हा एकदा कमळ फुललं आहे. जवळपास महिनाभरापासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यानंतर आज भाजपा नेते शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. काही वेळापूर्वीच त्यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली होती. राजभवनात शिवराज यांचा शपथविधी संपन्न झाला. त्यांनी चौथ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. थोड्याच वेळापूर्वी भाजपा आमदारांची बैठक पार पाडली. त्यात चौहान यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. मध्य प्रदेशच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करेन, अशी भावना त्यांनी यानंतर व्यक्त केली. कोरोनाचा संसर्ग रोखण्याचं प्रमुख आव्हान सध्या राज्यासमोर आहे. त्यामुळे याच विषयाला प्राधान्य देण्यात येईल. शपथविधी सोहळ्यानंतर कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचा जल्लोष करू नये. रस्त्यावर न उतरता घरातच थांबावं, असं आवाहन त्यांनी केलं होतं.काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिल्यानं कमलनाथ यांचं सरकार कोसळलं. बहुमत नसल्यानं कमलनाथ यांनी २० मार्चला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करत होते. मध्य प्रदेशच्या विधानसभेत एकूण २३० आमदार निवडून जातात. यातील २५ जागा सध्या रिक्त आहेत. सध्या विधानसभेत एकूण २०५ आमदार आहेत. यापैकी १०६ आमदार भाजपाचे आहेत. त्यामुळे भाजपाकडे बहुमत आहे. येत्या काही दिवसांमध्ये रिक्त असलेल्या २५ जागांसाठी पोटनिवडणूक होईल. ही निवडणूक भाजपा आणि काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची असेल.