श्रीनगर - काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी बुधवारी रात्री एका भाजपा नेत्याची गोळ्या झाडून हत्या केली. दहशतवाद्यांनी जिल्हाध्यक्ष वसिम बारी यांना ठार करत, त्यांच्या कुटुंबीयांवरही गोळ्या झाडल्या आहेत. या हल्ल्यात वसीम यांच्यासह त्यांचे भाऊ आणि वडिल यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरुन बारी कुटुंबींये सांत्वन केले.
जम्मू आणि काश्मीरच्या सीमारेषेवर दहशतवादी आणि भारतीय सैन्यांमध्ये सातत्यानेच चकमक सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, यावेळी दहशतवाद्यांनी बांदीपोरा जिल्ह्यातील भाजपा नेते वसिम बारी यांच्या कुटुंबावर हल्ला करत तिघांना ठार केले. हल्ल्यानंतर तात्काळ घटनास्थळावरून या दहशतवाद्यांनी धूम ठोकली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संपूर्ण परिसर सील केला आहे. तसेच, वसिमच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या 8 पीएसओंना चौकशीसाठी ताब्यातही घेण्यात आले आहे.
भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी याप्रकरणी ट्विट करुन माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बारी कुटुंबीयांचे फोनवरुन सांत्वन केले. तसेच, घटनेची चौकशीही केल्याचे सिंह यानी सांगितले. तसेच, दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बंदीपोराचे जिल्हाध्यक्ष वसीम बारी यांचा मृत्यू झाला असून त्यांचे वडिल आणि भाऊ हेही ठार झाल्याचे सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितले आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही वसिम यांच्या हत्येनंतर शोक व्यक्त केला आहे. आम्ही बंदोपोरा येथे शेख वसीम बारी, त्यांचे भाऊ आणि वडिल यांना गमावलं आहे. पक्षाचं हे मोठं नुकसान असून संपूर्ण भाजपा त्यांच्या कुटुंबीयांसमवेत या दु:खात सहभागी आहे. वसिम यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, असेही नड्डा यानी ट्विटरवरुन म्हटले आहे.