पणजी-
गोव्यातील ज्या कर्ली क्लबमध्ये भाजपा नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांचा मृत्यू झाला होता. त्याच कर्ली क्लबवर आज प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. क्लब पाडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पोलीस बंदोबस्तात बुलडोझरनं क्लबवर कारवाई करण्यात येत आहे. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनं गोव्याच्या रेस्टॉरंट कर्लीवर पाडकामाच्या कारवाईवर स्थगिती देण्याची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे कारवाईचा मार्ग मोकळा झाला होता. आज क्लबवर कारवाई करण्यासाठी प्रशासन पोहोचलं आहे.
कर्ली क्लबचे मालक एडविन नुन्स यांनी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये एक याचिका दाखल केली होती. यात त्यांनी गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून देण्यात आलेल्या कर्ली रेस्टॉरंट पाडण्याच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. एनजीटीनं याप्रकरणाच्या सुनावणीत कर्ली क्लबची याचिका फेटाळून लावली. म्हणजेच एनजीटीनंही कर्ली क्लब रेस्टॉरंट पाडण्याचा मार्ग मोकळा करुन दिला आहे.
खरंतर GCZMA नं २१ जुलै २०१६ रोजीच कर्ली रेस्टॉरंट पाडण्याचे आदेश दिले होते. नो डेव्हलपमेंट झोनमध्ये अवैध पद्धतीनं बांधकाम केल्याचा ठपका कर्ली क्लबवर ठेवण्यात आला होता. याविरोधात मालक एडविन यांनी एनजीटी म्हणजेच नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडे याचिका केली होती. ही याचिका ६ सप्टेंबर २०२२ रोजी फेटाळून लावण्यात आली.
२७ ऑगस्ट रोजी मालकाला अटकगोवा पोलिसांनी २७ ऑगस्ट रोजीच कर्ली क्लबच्या मालकाला अटक केली होती. यासोबत पोलिसांनी क्लबच्या बाथरुमधून ड्रग्ज देखील हस्तगत केले होते. याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ५ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी सोनाली फोगट प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्ट आणि कुटुंबीयांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सुधीर आणि सुखबिंदर यांना अटक केली. याच सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी यांच्यासोबत फोगाट २२ ऑगस्ट रोजी गोव्यात आल्या होत्या. सोनाली फोगाट यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमधूनही समोर आलं आहे.
सीसीटीव्ही फुटेज केलं जप्तगोवा पोलिसांनी सोनाली फोगाट मृत्यूप्रकरणी याच क्लबमधील सीसीटीव्ही फुटेज जप्त केलं आहे. यात सुधीर एका बाटलीतून सोनाली फोगाट यांना काहीतरी पाजत असल्याचं दिसून आलं आहे. सोनाली फोगाट वारंवार नकार देत असतानाही बळजबरीनं त्यांना पाजण्यात येत असल्याचं फुटेजमध्ये आढळून आलं आहे. सोनाली यांना एमडीएमए ड्रग्ज दिला गेल्याचा संशय पोलिसांना आहे. याबाबतची वैद्यकीय टीमकडून चाचणी आणि तपास सध्या केला जात आहे.