Vande Bharat Express: मेरठहून लखनऊला निघालेल्या वंदे भारत ट्रेनमध्ये पहिल्याच दिवशी एका मुलीशी गैरवर्तन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या ट्रेनला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर काही वेळातच वंदे भारत ट्रेनमध्ये गोंधळ झाला. भाजप नेत्याने तरुणीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात येत आहे. आरपीएफ आणि सुरक्षा जवानांनी बऱ्याच मेहनतीनंतर परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
उत्तर प्रदेशातील मेरठ ते लखनऊ दरम्यान शनिवारी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा गोंधळ उडाला. मेरठ-लखनऊ वंदे भारत ट्रेनमध्ये तरुणीसोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर ट्रेनमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. सुरक्षा रक्षकांनी कशीतरी परिस्थिती नियंत्रणात आणली. ट्रेनमध्ये भाजप कार्यकर्ते आणि सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर यांच्या हाणामारीचा व्हिडिओही समोर आला आहे.
वंदे भारत एक्सप्रेस मेरठ स्थानकातून निघताच हा सगळा प्रकार घडला. या प्रकरणातील आरोपी हा भाजपचा नेता असल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित मुलीचे म्हणणे आहे की, मी केबिनच्या शेवटच्या दरवाजातून जेवण आणण्यासाठी जात होते. यावेळी एका व्यक्तीने सांगितले की, ही भाजपची केबिन आहे. तुम्ही इथून जाऊ शकत नाही. तुम्ही लोक आम्हाला ओळखत नाही. आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत. त्यानंतर तरुणी आणि भाजप नेत्यामध्ये वाद झाला.
भाजप नेत्यांनी जागा सोडण्यास वारंवार नकार दिल्याचा आरोप तरुणी आणि तिच्या भावाने केला आहे. तरुणी जेवण आणायला गेली होती. भाजप नेत्यांनी तरुणीला बाहेर जाण्यापासून रोखले. नंतर जेव्हा ती जेवण घेऊन परतत होती तेव्हाही तिच्याशी गैरवर्तन करण्यात आले. याला तरुणीने विरोध केला असता, एकच गोंधळ उडाला. आपल्याला धक्काबुक्की करून मारहाण केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. माझ्या भावालाही मारहाण केली गेली. मुलीच्या आरोपानंतर वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की, आरपीएफचे एक पथक तात्काळ त्या कोचपर्यंत पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. आज देशाच्या उत्तर ते दक्षिण या विकासाच्या प्रवासात आणखी एक अध्याय जोडला जात आहे. वंदे भारत ट्रेन सेवा आजपासून मदुराई-बेंगळुरू, चेन्नई-नागरगोई आणि मेरठ-लखनऊ दरम्यान सुरू होत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.