तिला कोणत्याही मंदिरात लग्न करू दिले जाणार नाही; स्वत:शीच लग्न करणाऱ्या तरुणीला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 10:37 AM2022-06-06T10:37:58+5:302022-06-06T10:41:37+5:30
काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी या एकल लग्न किंवा स्व-विवाह हा वेडेपणा असल्याचं म्हटलं होतं.
गुजरातच्या वडोदरा येथे राहणाऱ्या क्षमा बिंदूचे ११ जूनला लग्न आहे. मात्र तिच्या या लग्नाची सध्या देशभरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. २४ वर्षीय क्षमा बिंदू दुसऱ्या कोणाशीही नाही तर चक्क स्वतःशीच लग्न करणार आहे.
क्षमा बिंदू सध्या तिच्या लग्नाच्या जय्यत तयारीत व्यस्त आहे. यासाठी तिने लेहंग्यापासून पार्लर आणि ज्वेलरीपर्यंत सर्व काही बुक केले आहे. स्वतःशीच लग्न करणार असली तरी या लग्नाची खास गोष्ट म्हणजे सर्व रितीरिवाजांसह हे लग्न पार पडणार आहे. मात्र तिच्या लग्नाला आता विरोध करण्यात येत आहे.
काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी या एकल लग्न किंवा स्व-विवाह हा वेडेपणा असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता गुजरातमधीलभाजपाच्या नेत्या सुनिता शुक्ला यांनी देखील क्षमा बिंदु हिच्या लग्नाला विरोध केला आहे. एकपत्नीक विवाह हिंदू धर्माच्या विरोधात असून त्यामुळे हिंदूंची लोकसंख्या कमी होईल, असं सुनिता शुक्ला यांनी म्हटलं आहे.
सुनिता शुक्ला म्हणाल्या की, मंदिरात अशा लग्नाला माझा विरोध आहे. तिला कोणत्याही मंदिरात लग्न करू दिले जाणार नाही. मी मंदिरातील एकल विवाहाविरोधात आहे. तिला कोणत्याही मंदिरात लग्न करू दिले जाणार नाही, असं सुनिता शुक्ला यांनी म्हटलं आहे.
असा निर्णय नेमका का घेतला?
लग्न करण्याची कधीच इच्छा नव्हती; पण वधू बनण्याचे स्वप्न होते. त्यामुळे स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. क्षमा बिंदू एका खासगी कंपनीत काम करते. ‘स्वयं-विवाह म्हणजे स्वतःसाठी आणि स्वतःवर बिनशर्त प्रेम करण्याची वचनबद्धता आहे. सामान्यपणे लोक त्यांचे ज्यांच्यावर प्रेम आहे, त्या व्यक्तीशी लग्न करतात. माझे स्वतःवर प्रेम आहे व म्हणून मी स्वतःशीच लग्न करतेय.’
हनिमूनसाठी गोव्याला!
आई-वडील खुल्या विचारांचे आहेत. या निर्णयास त्यांचा पाठिंबा आहे. त्यांनी यासाठी आशीर्वाद दिला. लग्नानंतर ती हनिमूनलाही जाणार आहे. गोत्रीच्या मंदिरातील विवाहासाठी तिने पाच नवसही लिहिले आहेत. क्षमा हनिमूनसाठी जवळपास दोन आठवडे गोव्यात असेल. देशात ‘सोलो लग्न’ करणारी ती पहिलीच मुलगी असावी, असेही तिने सांगितले.