नवी दिल्ली : दिल्लीतील (Delhi) बिंदापूर पोलीस स्टेशन हद्दीतील मटियाला रोडवरील भाजप (BJP) नेते सुरेंद्र मटियाला (Surendra Matiala) यांची शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या कार्यालयात दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली.
शुक्रवारी संध्याकाळी 7.45 च्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की, सुरेंद्र मटियाला यांची निर्घृणपणे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपासादरम्यान असे आढळून आले की, दोन अज्ञात हल्लेखोर हेल्मेट घालून कार्यालयात घुसले आणि त्यांनी मटियाला यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी जवळपास 8-10 राऊंड फायर केले, त्यापैकी 4 गोळ्या सुरेंद्र मटियाला यांना लागल्या.
दरम्यान, सुरेंद्र मटियाला यांच्यावर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. कार्यालयात उपस्थित लोकांनी सुरेंद्र मटियाला यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी सुरेंद्र मटियाला यांना मृत घोषित केले. सुरेंद्र मटियाला हे भाजपचे स्थानिक नेते होते आणि त्यांनी 2017 मध्ये नगरसेवकपदाची निवडणूकही लढवली होती.
सुरेंद्र मटियाला यांचे चुलत भाऊ आणि प्रत्यक्षदर्शी राम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यावेळी कार्यालयात एकूण 4 लोक उपस्थित होते. ज्यामध्ये राम सिंह यांच्यासह इतर दोन लोक बसून बोलत होते तर सुरेंद्र मटियाला हे टीव्ही पाहत होते. यादरम्यान, दोन जण कार्यालयात घुसले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. राम सिंह म्हणाले की, सुरेंद्र मटियाला यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मात्र, पोलीस या प्रकरणाच्या तपास करत असून कार्यालयाभोवती बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे.