पटना: 'सारे मोदी चोर हैं' या वक्तव्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. राहुल गांधींच्या या वक्तव्यावरुन भाजपाने हल्लाबोल सुरु आहे. तर, बिहारमधील भाजपाचे वरिष्ठ नेता आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी त्यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात अशा प्रकारचे वक्तव्य करुन मोदी टायटल असलेल्या व्यक्तींना चोर म्हटले आहे. यामुळे समाजात त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे, असे सुशील कुमार मोदी यांनी म्हटले आहे. तसेच, हे गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य असून याची शिक्षा कोर्टामार्फत राहुल गांधी यांना झाली पाहिजे, असेही सुशील कुमार मोदी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना 'सारे मोदी चोर हैं' असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. देशातून फरार झालेल्या नीरव मोदी आणि ललित मोदी यांचे उदाहरण देताना राहुल गांधी यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केले होते. राहुल गांधी यंदाची लोकसभा निवडणूक दोन मतदार संघातून लढवत आहेत. उत्तर प्रदेशातील पारंपरिक असलेला अमेठी आणि केरळातील वायनाड या दोन मतदार संघातून राहुल गांधी आपले नशीब आजमावणार आहेत.