पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री बनण्याची आपल्याला ऑफर आली होती. मात्र, ती मी नाकारली होती, असा दावा सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे. बुधवारी इग्रा येथील एका सभेला संबोधित करताना सुवेंदू अधिकारी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, 1 डिसेंबर 2020 रोजी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षात असताना त्यांना उपमुख्यमंत्री बनण्याची ऑफर देण्यात आली होती.
"माझ्याकडून काहीही घेतले गेले नाही. काम केले नाही, मी पाच खात्यांचा मंत्री होतो. मी ते नाकारले. शेवटची ऑफर 1 डिसेंबर 2020 रोजी उपमुख्यमंत्री पदाची होती. मी तीही नाकारली. कारण पश्चिम बंगालला वाचवायचे होते. राज्याचा दर्जा वाचवायचा होता", असा दावा सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. सुवेंदू अधिकारी यांना कोणीही उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली नाही, असे कुणाल घोष यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, कुणाल घोष यांनी ट्विटद्वारे सुवेंदू अधिकारी यांच्या कुटुंबाकडे टीएमसी सरकारमध्ये अनेक पदे होती. सीबीआयने नारदामध्ये त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केल्यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी टीएमसीकडे घटनात्मक पद मागितले होते, असे म्हटले आहे. कुणाल घोष म्हणाले, "सुवेंदू अधिकारी यांना उपमुख्यमंत्री बनण्याची ऑफर कोणीही दिली नाही. जेव्हा सीबीआयने त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला, तेव्हा त्यांनी स्वत: घटनात्मक पदाच्या नावाखाली हे पद मागितले. मात्र त्यांच्या चार लोकांनी इतकी सर्व पदे घेतली, त्यामुळे पक्षाने नकार दिला. त्यानंतर अटक टाळण्यासाठी ते भाजपमध्ये गेले."