कोहिमा- ईशान्य भारतातल्या नागालँड राज्यात भाजपानं मिळवलेल्या यशानंतर नेत्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. या जल्लोषाच्या उन्मादात भाजपाच्या एका नवनिर्वाचित आमदारानं चक्क बाल्कनीतून पैसे उडवले आहेत. त्यानंतर फेकलेले पैसे उचलण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली, या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ही घटना नागालँडमधल्या जुन्हेबोटो जिल्ह्यातील सुरुहोटो विधानसभा क्षेत्रातील आहे.भाजपाच्या 19 जागा निवडून आल्यानंतर भाजपा आमदार एच. खेहोवी यांनी स्वतःच्या बाल्कनीतून नोटा फेकल्याची घटना घडली आहे. एच. खेहोवी यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि ती जिंकलीसुद्धा. 52 वर्षांचे खेहोवी भरपूर श्रीमंत आहेत. ते पहिले सरकारी कर्मचाही होते. निवृत्तीनंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि त्यानंतर ते राजकारणात आले. ते आता सुरुहोटो विधानसभा क्षेत्रातील आमदार आहेत. 3 मार्च रोजी लागलेल्या निकालानंतर नागालँडमध्ये भाजपा आघाडी सरकार बनवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपानं इथे स्वतःची सहयोगी पार्टी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी(NDPP)बरोबर सत्ता स्थापन करणार आहे. नागालँडमध्ये भाजपा आणि एनडीपीपी आघाडीनं 29 जागांवर विजय मिळवला आहे.तर एका जागेवर निवडून आलेले जेडीयूचे आमदार आणि एक अपक्ष आमदार हेसुद्धा भाजपा आघाडीला समर्थन देणार आहेत. नागालँड पीपल्स फ्रंट(एनपीएफ)ने 27 आणि इतर तीन जागांवर विजय मिळवला आहे. राज्यातील निवडणुकांचा निकाल पाहता राजकीय समीकरणं जुळवाजुळवीला वेग आला आहे. नागालँडमधील 60 सदस्यीय विधानसभेत रियो यांच्या एनडीपीपीला 18, तर सहकारी पक्ष भाजपला 12 जागा मिळाल्या आहेत.
विजयाच्या उन्मादात भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारानं बाल्कनीतून उडवले पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2018 4:48 PM