भोपाळ - मध्य प्रदेश निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं येथील राजकारण तापलं आहे. भाजपाकडून कमलनाथ यांचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. 'उमेदवारावर एक गुन्हा दाखल असो किंवा पाच, पण आपल्याला जिंकणाराच उमेदवार हवाय', असे वक्तव्य करताना कमलनाथ या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
या व्हिडीओवरुन भाजपा आणि काँग्रेस आमनेसामने आले आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि भाजपा नेत्यांनी कमलनाथ यांच्यासहीत काँग्रेसवर हल्लाबोल चढवला आहे. कमलनाथ यांचा संबंधित व्हिडीओ शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये कमलनाथ तिकीट वाटपासंदर्भात उपस्थितांसोबत बोलताना दिसत आहेत. 'उमेदवारावर एक गुन्हा दाखल असो किंवा पाच, पण मला जिंकणाराचा उमेदवार हवाय', असे बोलताना कमलनाथ या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
हा व्हिडीओ शिवराजसिंह चौहान यांनी ट्विट करत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. 'जर हेच काँग्रेसचे राजकारण असेल तर... जनता समजुतदार आहे... 28 नोव्हेंबरला कोणाला मतदान करुन विजयी करायचे, याचा निर्णय जनताच घेईल'.
व्हिडीओमध्ये छेडछाड - काँग्रेसकमलनाथ यांच्या मूळ व्हिडीओसोबत छेडछाड करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या शोभा ओझा यांनी शिवराजसिंह चौहान यांना प्रत्युत्तर दिले आे. ''शिवराजसिंह चौहान आता आपली पत राखण्यासाठी या छेडछाड केलेल्या व्हिडीओचा आाधार घेणार आहेत?, एडिट केलेल्या या व्हिडीओला जनता 28 नोब्हेंबरला उत्तर देईल'', असे रिट्विट ओझा यांनी केले आहे.
शिवाय, शिवराजसिंह चौहान यांच्या ट्विटची तक्रार निवडणूक आयोगात करणार असल्याचंही ओझा यांनी सांगितले.