उमा भारती करणार कुटुंबाचा त्याग, 'दीदी माँ' नावाने ओळखल्या जाणार; यामुळे घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 01:45 PM2022-11-06T13:45:54+5:302022-11-06T13:46:18+5:30
मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या उमा भारती यांनी कुटुंबाचा त्याग करण्याची घोषणा केली आहे.
भोपाळ:मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या उमा भारती (Uma Bharti) यांनी कुटुंबाचा त्याग करण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी भारती यांनी जाहीर केले की, जैन संत आचार्य विद्यासागर महाराज यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी त्या आपल्या कुटुंबाचा त्याग करत आहेत. तसेच, त्या आता 'दीदी माँ' या नावाने ओळखल्या जाणार आहेत.
येत्या 17 नोव्हेंबर रोजी त्या गुरूच्या परवानगीने कुटुंबातील सदस्यांशी असलेले सर्व संबंध संपवणार आहेत. सलग 14 ट्विट करत उमा भारती यांनी ही घोषणा केली. आपल्या ट्विटमध्ये उमा भारती यांनी निवृत्तीचे संपूर्ण स्पष्टीकरण तर दिले आहेच, पण त्यांना फक्त 'दीदी माँ' या नावानेच का संबोधले जाईल हे देखील सांगितले आहे.
30 वर्षांपूर्वी घेतला होता संन्यास
17 नोव्हेंबर 1992 रोजी त्यांनी अमरकंटकमध्ये 'संन्यास' घेतला होता, तेव्हा त्यांचे नाव उमा ऐवजी उमाश्री भारती करण्यात आले होते. या गोष्टीला 17 नोव्हेंबर 2022 रोजी 30 वर्षे होतील. उमा भारती म्हणाल्या की, गुरु विद्यासागर जी महाराज यांच्या सल्ल्यानुसार 30 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 17 नोव्हेंबरपासून त्या 'दीदी माँ' म्हणून ओळखल्या जातील.
'आता तुम्हीच माझे कुटुंब आहात'
उमा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, 'ज्या कुटुंबात माझा जन्म झाला...माझ्या राजकीय प्रवासात माझ्या भावांनी आणि पुतण्यांनी मला खूप साथ दिली. किंबहुना त्यांनी आपला जीव पणाला लावला, अनेक समस्यांना तोंड दिले. आता सर्वजण आपापल्या परीने प्रगती करत आहेत, मुली मोठ्या कॉलेजमध्ये आहेत. सून पायलट आहे, डॉक्टर आहे, वकील आहे…. हे कुटुंब माझे संपूर्ण जग आहे. पण आता एका कुटुंबाऐवजी तुम्ही सर्व माझे कुटुंब आहात… आता माझे कुटुंब देखील माझ्यापासून मुक्त आहे आणि मी देखील माझ्या कुटुंबापासून मुक्त होणार आहे.'